
सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत जुळे सोलापूर येथील भंडारी मैदान येथे झालेल्या सामन्यामध्ये एचपीसीसी बार्शी क्रिकेट अकॅडमीने मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी सोलापूर संघाचा २८ धावांनी पराभव केला.
ही स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शन यांनी पुरस्कृत केली आहे. नाणेफेक जिंकून मॉडेल क्रिकेट अकॅडमीने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एचपीसीसी संघाने २९ षटकांमध्ये सर्वबाद १३६ धावा केल्या. त्यामध्ये गौरव गाडेकर याने ३० धावा व पृथ्वी खोडवे याने २५ धावा केल्या. मॉडेल क्रिकेट अकॅडमी संघाकडून निहार पॉल याने २१ धावांत तीन बळी व श्लोक आनंद याने सहा धावा देऊन एक बळी घेतला.
मॉडेल क्रिकेट अकॅडमी संघाने २२ षटकात सर्वबाद १०८ धावा केल्या. त्यामध्ये कार्तिक पाटोळे याने ३८ धावा केल्या. एचपीसीसी संघाकडून गौरव गाडेकर याने २१ धावांत तीन बळी व अर्णव जगदाळे याने २१ धावांत तीन बळी घेतले. सामनावीर पुरस्कार गौरव गाडेकर याला देण्यात आला.