शुभमन गिलचे ऐतिहासिक शतक, भारत पाच बाद ३१०

  • By admin
  • July 2, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

यशस्वी जैस्वालची ८७ धावांची दमदार खेळी, रवींद्र जडेजाची बहारदार फलंदाजी
 
एजबॅस्टन : कर्णधार शुभमन गिलच्या ऐतिहासिक शतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ८५ षटकांत पाच बाद ३१० धावसंख्या उभारली. शुभमन गिल (नाबाद ११४) याने नाबाद शतक ठोकताना रवींद्र जडेजा (नाबाद ४१) समवेत सहाव्या विकेटसाठी नाबाद ९९ धावांची भागीदारी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालची ८७ धावांची खेळी दमदार राहिली. 

कर्णधार शुभमन गिल याने सलग दुसरे शतक साजरे करुन हा कसोटी सामना ऐतिहासिक व संस्मरणीय बनवला. शुभमन गिल याने प्रथम यशस्वी जैस्वाल आणि त्यानंतर रवींद्र जडेजा समवेत शानदार भागीदारी केली. २११ धावांवर पाचवा फलंदाज बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात उतरला. जडेजा याने ६७ चेंडूत नाबाद ४१ धावा फटकावत गिलला सुरेख साथ दिली. जडेजाने पाच चौकार मारले. गिल-जडेजा यांच्यातील ९९ धावांच्या भागीदारीने इंग्लंड संघ कसोटीवर पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवू शकला नाही. 

तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. केएल राहुल अवघ्या २ धावांवर बाद झाला. त्याने तब्बल २६ चेंडूंचा सामना केला. १५ धावसंख्येवर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि करुण नायर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. या भागीदारीने संघाचा डाव सावरला. या सामन्याच्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल उत्तम फॉर्ममध्ये होता. यशस्वी त्याचे शतक पूर्ण करेल असे वाटत होते पण बेन स्टोक्सने त्याला ८७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि बेन स्टोक्स यांच्यात एक छोटीशी बाचाबाची झाली.

भारताच्या डावाच्या १७ व्या षटकात बेन स्टोक्स आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात वाद झाला. त्या षटकात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स स्वतः गोलंदाजी करत होता. यादरम्यान, त्याने जैस्वालला काही शब्द सांगितले, ज्याला उत्तर म्हणून जैस्वालनेही बेन स्टोक्सला काहीतरी सांगितले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर बेन स्टोक्सने अखेर जैस्वाल याला बाद केले. आऊट झाल्यानंतर जैस्वाल खूपच निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसला.

एजबॅस्टन कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने १०७ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने १३ चौकार मारले. जर त्याने या डावात शतक पूर्ण केले असते तर त्याच्या नावावर आणखी काही विक्रम जोडले गेले असते पण आता हे होऊ शकले नाही. लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, तिथेही त्याने पहिल्या डावात १०१ धावांची खेळी खेळली. पण दुसऱ्या डावात तो फक्त ४ धावा काढून बाद झाला. तथापि, त्या सामन्यात जैस्वालचे क्षेत्ररक्षण खूप खराब होते, ज्यामुळे त्याला खूप ट्रोलही करण्यात आले.

करुण नायर सुरेख फलंदाजी करत होता. मात्र, नायर ५० चेंडूत ३१  धावा काढून बाद झाला. त्याने पाच चौकार मारले. ऋषभ पंत याने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक साजरे केले होते. या कसोटीत पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, पंत २५ धावांवर तंबूत परतला. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (१) वोक्सचा बळी ठरला. ख्रिस बोक्स याने ५९ धावांत दोन गडी बाद केले. कार्से (१-४९), स्टोक्स (१-५८) व बशीर (१-६५) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामन्यात शतक
मोहम्मद अझरुद्दीन (१९८४-१९८५)
दिलीप वेंगसरकर (१९८५-१९८६)
राहुल द्रविड (२००२)
राहुल द्रविड (२००८-२०११)
शुभमन गिल (२०२४-२०२५)
विजय हजारे (१९५१-५२ मध्ये दिल्ली आणि ब्रेबॉर्न) आणि मोहम्मद अझरुद्दीन (१९९० मध्ये लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड) यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामन्यात शतके झळकावणारा गिल हा तिसरा भारतीय कर्णधार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *