सुमा शिरूर एसजेएएम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

  • By admin
  • July 3, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

ऑलिम्पियन प्रशिक्षकांचा जागतिक क्रीडा पत्रकार दिनी सन्मान

मुंबई ः भारतीय नेमबाजी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या सन्मानार्थ, ऑलिम्पियन आणि भारतीय नेमबाजी संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षक सुमा शिरूर यांना यंदाचा एसजेएएम जीवनगौरव पुरस्कार २०२५ क्रीडा पत्रकार संघटना – स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे प्रदान करण्यात आला. 

जागतिक क्रीडा पत्रकार दिनानिमित्त, मुंबईतील प्रतिष्ठित बॉम्बे जिमखाना येथे हा सोहळा पार पडला. या गौरवाचा साक्षीदार ठरल्या त्यांच्या दीर्घकालीन सहकारी आणि भारतीय नेमबाजी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व दीपाली देशपांडे आणि अंजली भागवत.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुमा शिरूर यांच्या खेळाप्रती असलेल्या अपूर्व समर्पणाचे प्रतीक आहे. ऑलिम्पिक अंतिम फेरी गाठणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला नेमबाज म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पॅरिस ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले. पदके आणि टप्प्यांपुरतेच नव्हे, तर निष्ठा, शांतपणे केलेली अविरत मेहनत आणि उत्कृष्टतेचा ध्यास हे त्यांच्या वाटचालीची खरी ओळख.

एसजेएएम जीवनगौरव पुरस्कार हा क्रीडा पत्रकार क्षेत्रातील सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी एक मानला जातो. २०१६ साली क्रिकेट सम्राट सुनील गावसकर यांना हा पुरस्कार दिला गेला होता. त्यामुळे यंदा सुमा शिरूर यांचा या पुरस्कारासाठी निवड होणे हे अधिकच विशेष मानले जात आहे, कारण यामुळे त्या क्रीडा क्षेत्रातील थोर विभूतींच्या दर्जेदार यादीत सामील झाल्या आहेत.

सन्मान स्वीकारताना सुमा शिरूर म्हणाल्या, “या मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ मुंबईचे मनापासून आभार मानते. माझ्या प्रिय सहकारी मित्रांसोबत हा सन्मान मिळणं हा माझ्यासाठी मोठा आदर आहे. भारतीय नेमबाजी क्रीडेला अधिक विकसित करण्याच्या माझ्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे नवी प्रेरणा मिळेल.”

प्रशिक्षक म्हणून त्यांची कामगिरी लक्षणीय आहेच, पण त्याचबरोबर सुमा शिरूर या क्रीडा क्षेत्रातील महिला सहभाग आणि स्थानिक पातळीवरील सहभाग वाढवण्याच्या बाबतीत एक प्रभावी आवाज ठरल्या आहेत. त्यांच्या लक्ष्य शूटिंग क्लबमधून त्यांनी २०० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. यामध्ये टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा, कनिष्ठ विश्वविजेता पार्थ, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेता किरण जाधव आणि युथ ऑलिम्पिक पदक विजेता शहू माने यांचा समावेश आहे. भारतीय नेमबाजी व खेळाडू घडवणाऱ्या कार्यासाठी २०२४ मधील इंडियन स्पोर्ट्स ऑनर्समध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *