
राज्य बॅडमिंटन स्पर्धा
ठाणे ः राज्यभरातील २२ जिल्ह्यातील दोनशेहून अधिक १९ वर्षांखालील खेळाडूंचा सहभाग असणारी राज्य ज्युनिअर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा ठाणेकर खेळाडूंनी गाजवली आहे. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.
ठाण्याच्या आघाडीचा खेळाडू व देशाच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणारा सर्वेश यादव याने श्रावणी वाळेकर साथीला घेऊन मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. विशेष म्हणजे श्रावणी दुखापतग्रस्त असूनही सर्वेश याने एकट्याच्या प्रयत्नात सामना खेचून आणला आणि आदित्य त्रिपाठी व क्रिशा सोनी या पुणेकर जोडीला २१-१६ २१-१२ सरळ गेममध्ये पराभूत केले.
याच स्पर्धेत ठाण्यासाठी दुसरे सुवर्ण पदक पटकावताना अर्जुन व आर्यन बिराजदार दोघा जुळ्या भावांनी पराक्रमाची कमाल केली. गेले अडीच वर्षे ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या प्रगत प्रशिक्षणाचा लाभ उठवत केलेली प्रगती अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांनी अंतिम फेरीत ओम गवंडी व सानिध्य एकाडे या दुसऱ्या ठाणेकर जोडीला सरळ गेम मध्ये २१-०९ २१-१३ असे सहज पराभूत केले. त्यामुळे ओम व सानिध्य यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या दुहेरीच्या गटात ठाणेकरांचे संपूर्ण वर्चस्व राहिले. सानिध्य एकाडे आणि अदिती गावडे यांनी मिश्रदुहेरीत कांस्यपदक मिळवले. तर यश ढेंबरे आणि अर्जुन रेड्डी यांनी मुलांच्या दुहेरीत कांस्यपदकाची कमाई केली.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अशा तऱ्हेने ठाण्याचे वर्चस्व राहिले. या चमकदार यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व सर्व प्रशिक्षकांचे ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी अभिनंदन केले आहे.