
चेन्नई ः तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली डिंडीगुल ड्रॅगन्स संघाने त्रिची ग्रँड चोलस संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. अश्विनने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे त्याने आपल्या गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला.
अश्विन त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्रिची ग्रँड चोलसच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १४० धावा केल्या. त्यानंतर, डिंडीगुलच्या संघाने लक्ष्य सहज गाठले.
अश्विनची ८३ धावांची खेळी
रविचंद्रन अश्विनने डिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून सलामीला आला आणि त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच आपली स्फोटक फलंदाजी सुरू ठेवली. अश्विनने विरोधी संघाच्या गोलंदाजांनाही सोडले नाही. त्याने ४८ चेंडूत ११ चौकार आणि तीन षटकार मारत ८३ धावा केल्या. अश्विनच्या खेळीमुळे सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. त्याच्याशिवाय शिवम सिंगने १६ धावांचे योगदान दिले. बाबा इंद्रजीतने २९ चेंडूत २७ धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार होता. त्रिची ग्रँड चोलसचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही.
त्रिची ग्रँड चोलस संघाने १४० धावा केल्या
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या त्रिची ग्रँड चोलस संघाकडून वसीम अहमदने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर सुरेश कुमारने २३ धावा केल्या. जफर जमालने ३३ धावा केल्या. या खेळाडूंच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळींच्या जोरावरच संघ १४० धावा करू शकला.
डिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून रविचंद्रन अश्विनने ४ षटकांत २८ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्तीने दोन बळी घेतले. जी. पेरियास्वामीने दोन बळी घेतले. या गोलंदाजांसमोर त्रिची ग्रँड चोलस संघाचे फलंदाज मोकळेपणाने फटके खेळू शकले नाहीत.