नाशिक येथे राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा रंगणार

  • By admin
  • July 4, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

देशभरातून ३९० खेळाडूंचा सहभाग

 नाशिक ः महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिज जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डीएसएफ स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या पंचवटी येथील मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल येथे ५ ते ७ जुलै दरम्यान सातव्या चाईल्ड कप आणि १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या स्पर्धेत भारतातून विविध राज्यांचे ३९० खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रासह जम्मू – काश्मीर, पंजाब, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, दिव – दमण, मणिपूर, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ आदी राज्यांचा समावेश आहे. 
या स्पर्धेचे उद्घाटन ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सिमा शुल्क खात्याचे उपआयुक्त अजित दान आणि आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सिग्नेचर इंटरनॅशनल फूडचे मॅनेजिंग डायरेक्टर यतीन पटेल, नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे मेंटॉर अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सचिव डॉ उदय डोंगरे, आनंद खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चाईल्ड (१० वर्षे) आणि मिनी (१४ वर्षे) या वयोगटा पासूनच खेळाडूंना स्पर्धेचा सराव मिळाला तर नक्कीच खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत आणि ऑलिम्पिकपर्यंत मजल मारू शकतील या उद्देशांनेच या दोन गटांच्या स्पर्धचे प्रथम नाशिकमध्येच १३ वर्षांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक उत्तम दर्जेदार खेळाडू घडले आहेत असे दिसून येत आहे. या स्पर्धाला नाशिकच्या क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन  द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्त पाटील, सचिव राजू शिंदे, दीपक निकम, अशोक कदम, नितीन हिंगमिरे, उदय खरे, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ, प्रसाद परदेशी, अविनाश वाघ आणि सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *