
- शुभमन गिलचे ऐतिहासिक शतक, आकाश दीपची घातक गोलंदाजी
- इंग्लंड तीन बाद ७२ धावा, जिंकण्यासाठी ५३६ धावांची गरज
बर्मिंगहॅम : कर्णधार शुभमन गिलचे ऐतिहासिक शतक आणि केएल राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या दमदार अर्धशतकांच्या मदतीने भारताने सहा विकेट गमावून ४२७ धावांवर दुसरा डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताने ६०७ धावांची आघाडी मिळवली आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने ७२ धावांत तीन गडी गमावले आहेत. दुसरा कसोटी जिंकण्यासाठी भारताला आता सात विकेटची आवश्यकता आहे. दुसरीकडे इंग्लंडला जिंकण्याकरिता ५३६ धावांची गरज आहे.
चौथ्या दिवसाचे शेवटचे सत्र सनसनाटी खेळाचे ठरले. भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली आणि त्यानंतर मोहम्मद सिराज व आकाश दीप या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंड संघासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. सिराजने झॅक क्रॉली याला शून्यावर बाद करुन इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यानंतर आकाश दीप याने आपल्या भेदक गोलंदाजीने दहशत निर्माण केली. आकाशने बेन डकेट याला २५ धावांवर बाद करुन संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर आकाश दीपने अनुभवी फलंदाज जो रुट याला अवघ्या ६ धावांवर क्लीन बोल्ड करुन इंग्लंडला मोठा धक्का दिला. आकाश दीपची घातक गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा १६ षटकात तीन बाद ७२ धावा काढल्या. ऑली पोप २४ तर हॅरी ब्रूक १५ धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, भारतीय संघाकडून शुभमन गिलने शानदार कामगिरी केली आणि १६१ धावा केल्या. शुभमन गिल याने दुसऱ्या डावातही शतक ठोकून दिग्गज सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला. रवींद्र जडेजा ६९ धावा करून नाबाद परतला. इंग्लंडकडून जोश टोंग आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर ब्रायडन कार्स आणि जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारताने चौथ्या दिवशी ६४ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. भारताला दिवसाचा पहिला धक्का करुण नायरच्या रूपात बसला जो २६ धावा करून बाद झाला. त्यानंतर राहुलने गिलसोबत डाव पुढे नेला आणि अर्धशतक झळकावले, परंतु टोंगने राहुलला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. राहुल ५५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंत आला आणि त्याने गिलसोबत वेगाने खेळण्यास सुरुवात केली. पंतने गिलसोबत चौथ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली जी शोएब बशीरने पंतला बाद करून मोडली. पंत ६५ धावा करून बाद झाला.
पंत बाद झाल्यानंतर गिलने आपली शानदार कामगिरी सुरू ठेवली आणि रवींद्र जडेजासोबत भागीदारी केली. गिलने शतक झळकावले आणि आपली उत्तम लय कायम ठेवली. गिलने पहिल्या डावात द्विशतक झळकाविले होते. त्याने जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी १७५ धावा जोडल्या आणि भारताला मजबूत स्थितीत आणले. गिलची विकेट बशीर याने मिळवली. गिलने १६२ चेंडूंच्या आपल्या डावात १३ चौकार आणि आठ षटकार मारले. त्यानंतर नितीश रेड्डी एक धाव घेऊन बाद झाला. जडेजाव्यतिरिक्त, वॉशिंग्टन सुंदर १२ धावा करून नाबाद परतला.

गिलने ५४ वर्षे जुना विक्रम मोडला
या शतकासह गिलने मोठी कामगिरी करण्यात यश मिळवले आहे. सुनील गावसकर नंतर गिल दुसरा भारतीय फलंदाज आहे आणि एकाच कसोटी सामन्यात द्विशतक झळकावून शतक करणारा एकूण नववा फलंदाज आहे. गावसकरने १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात शतक झळकावले होते, तर दुसऱ्या डावात द्विशतक झळकाविले होते. अशा प्रकारे गिल कसोटी सामन्यात ही कामगिरी करणारा ५४ वर्षांनंतर दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे.
दोन्ही डावात शतक झळकावणारा तिसरा भारतीय कर्णधार
गिल कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा तिसरा भारतीय कर्णधार आहे. त्याच्या आधी सुनील गावसकर आणि विराट कोहली यांनी असे केले आहे. गावसकरने १९७८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली आणि कोहलीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली. गावसकरने १०७ आणि नाबाद १८२ धावा केल्या, तर कोहलीने ११५ आणि १४१ धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात गिलने २६९ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात शतक करण्यात तो यशस्वी झाला. त्याचबरोबर, कर्णधार म्हणून पहिल्या दोन कसोटी सामन्यात तीन शतके झळकावणारा गिल हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. कोहलीने त्याच्या आधी ही कामगिरी केली आहे. इतकेच नाही तर, एका कसोटी मालिकेत तीन किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारा गिल हा तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. एका कसोटीत भारतीय कर्णधाराने सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. गावसकर यांनी १९७८/७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चार शतके झळकावली. कोहलीने २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर तीन शतके आणि २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तीन शतके झळकावली. आता गिल यानेही सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर तीन शतके झळकावून या यादीत सामील झाला आहे.
कसोटीत ३५० प्लस धावा करणारा पहिला भारतीय
गिलने आपल्या शानदार खेळीने इतिहास रचला आहे आणि कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय फलंदाज बनला आहे. या बाबतीत गिलने भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांना मागे टाकले आहे. गावसकर यांनी १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एकूण ३४४ धावा केल्या. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गिलने ४३० धावा केल्या आणि ५४ वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. कसोटी सामन्यात ४०० पेक्षा जास्त धावा करणारा गिल हा पहिला भारतीय फलंदाज आहे.