
नाशिक ः राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, हरियाणाच्या खेळाडूंची सुवर्ण भरारी घेतली आहे. त्यात महाराष्ट्राच्या श्रीराज, रियांश, समृद्धी, शहानूर यांनी सुवर्णपदकाची कमाई करत स्पर्धा गाजवली.
महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिज जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डीएसएफ स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजीत सातव्या चाईल्ड कप आणि १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत १० वर्षे मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ याने अंतिम लढतीत तामिळनाडूच्या ए एस जोसेफ याचा ११-८ असा तीन गुणांनी पराभव करून सुवर्णपदक पटकावले, तर ए एस जोसेफ याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात महाराष्ट्रचा अरोह जाधव आणि पंजाबचा हेयांश गर्ग यांनी संयुक्त कांस्य पदक मिळविले.
फॉइल प्रकारात तेलंगणाच्या गुंमदी रियांश याने अंतिम लढतीत आंध्र प्रदेशच्या मुडूनुरी हर्षित याच्यावर ९-७ अशा दोन गुणांनी विजय मिळवत सुवर्ण पदक मिळविले. या प्रकारात तामिळनाडूचा इ नवीन आणि पंजाबचा संकेत यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळविला.
मिनी गटात राजस्थान आणि हरियाणाची सरशी
मिनी मुलींच्या गटामध्ये राजस्थान आणि हरियाणाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण पदके मिळविली. मिनी मुलींच्या फॉईल प्रकारात हरियाणाच्या समृद्धी आणि तेलंगणाच्या सारा मरियम यांच्यातील अंतिम सामना चांगलाच रंगतदार झाला. पहिल्या सत्रात सारा मरियमने ४-३ अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये समृद्धीने ही पिछाडी भरून काढत हा सामना ७-६ असा एक गुणाने जिंकून सुवर्णपदक मिळवले. या गटात हरियाणाच्या नव्या यादव आणि साक्षी यांनी संयुक्त कांस्य पदके मिळविली.
मुलीच्या मिनी सॅबर प्रकारात अंतिम सामन्यात राजस्थानच्या शहानूर अली हिने प्रथमपासूनच आघाडी घेत अंतिम सामन्यात केरळच्या स्वराली लागू हिचा ८-५ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. स्वरालीला रौप्य पदक तर पंजाबच्या गुन्तास कौर आणि विधी शर्मा यांनी संयुक्त कांस्य पदक मिळविले.
विविध प्रकारात पदके प्राप्त केलेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता, अशोक दुधारे, आनंद खरे राहुल वाघमारे, राजू शिंदे यांच्या हस्ते आकर्षक मेडल्स आणि प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांचे ३९० खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्त पाटील, सचिव राजू शिंदे, दीपक निकम, अशोक कदम, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ, प्रसाद परदेशी आणि सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.