टेबल टेनिस स्पर्धेत श्रेयस माणकेश्वरचा विजेतेपदाचा चौकार 

  • By admin
  • July 7, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

पुरुष गटात शौनक शिंदे अजिंक्य, महिला गटात पृथा वर्टीकरला जेतेपद

पुणे ः डॉक्टर सतीश ठिगळे स्मृती प्लेयर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत श्रेयस माणकेश्वर याने विजेतेपदाचा चौकार नोंदविला. पुरुष गटात शौनक शिंदे तर महिला गटात पृथा वर्टीकर विजेतेपदाचे मानकरी ठरले. कौस्तुभ गिरगावकर व रुचिता दारवटकर यांनी आपापल्या गटात अजिंक्यपद पटकाविले.

या स्पर्धेस बालुफ ऑटोमेशन व ज्येष्ठ खेळाडूंनी आर्थिक सहकार्य केले आहे. ही स्पर्धा सिम्बायोसिस क्रीडा केंद्र (प्रभात रस्ता) येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत रविवारी झालेले अंतिम सामने अतिशय चुरशीने खेळले गेले. 

टॉस अकादमीचा खेळाडू श्रेयस याने सतरा वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात रामानुज जाधव या सातव्या मानांकित खेळाडूवर ११-९,१३-११,१२-१० अशी सरळ तीन गेम्स मध्ये मात केली. त्याचे हे या मोसमातील चौथे विजेतेपद आहे. १९ वर्षाखालील गटात कौस्तुभ गिरगावकर या क्रीडा प्रबोधिनीच्या अव्वल मानांकित खेळाडूने अंतिम सामन्यात तृतीय मानांकित प्रणव घोलकर याच्यावर मात केली. अतिशय चुरशीने झालेला हा सामना त्याने ११-३,१३-१५,६-११, ८-११,११-९, ११-९, ११-७ असा जिंकला.

पुरुषांच्या अंतिम लढतीत तेराव्या मानांकित शौनक शिंदे यांनी तृतीय मानांकित खेळाडू जय पेंडसे याच्यावर अनपेक्षित विजय नोंदविला हा सामना त्याने ११-८,११-५, ११-१३,११-४, ११-५ असा जिंकला. प्रौढांच्या ४० वर्षावरील गटात मनोज फडके या सातव्या मानांकित खेळाडूंनी अग्रमानांकित संतोष  वाकराडकर यांना ७-११,७-११,११-७,११-५, ११-८ असे पराभूत केले आणि अजिंक्यपद पटकाविले पहिल्या दोन गेम्स गमावल्यानंतर त्यांनी बहारदार खेळ करीत विजय मिळविला. साठ वर्षावरील गटात अग्रमानांकित रोहिण्टन तोडीवाला यांनी हरीश साळवी यांचा ११-६, ९-११, ११-९,११-७ असा पराभव करीत आपल्या खात्यावर आणखी एका विजेतेपदाची नोंद केली.

महिलांच्या अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथा विजेती ठरली. मात्र त्यासाठी तिला द्वितीय मानांकित स्वप्नाली नराळे हिच्याविरुद्ध संघर्ष करावा लागला. हा सामना तिने ११-१३,१३-११,११-६, १२-१०, ११-५ असा जिंकला. १९ वर्षाखालील गटात द्वितीय मानांकित दारवटकर हिने अंतिम सामन्यात नवव्या मानांकित आद्या गवात्रे हिच्यावर ९-११,११-८,११-८,११-९,११-१ अशी मात केली. १७ वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत स्वरदा साने या टॉप अकादमीच्या खेळाडूने द्वितीय मानांकित खेळाडू सई कुलकर्णी हिचा ८-११,११-९, १४-१२,६-११,११-८ असा पराभव केला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाला. यावेळी बालुफ ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.उदय भालचंद्र, सिंबायोसिस संस्थेच्या परदेशी विभागाचे प्रमुख अमेय येरवडेकर, तसेच टेबल टेनिस संघटक राजीव बोडस, स्मिता बोडस, प्रकाश तुळपुळे, श्रीमती ठिगळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *