< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न – Sport Splus

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न

  • By admin
  • July 8, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

नाशिक ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ परिषद निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर विजयी पदाधिकाऱ्यांचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी अभिनंदन केले.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विद्यापीठातर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजनांची माहिती महाविद्यालय स्तरावर मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना द्यावी. सर्व नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कामांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थी यांच्यातील संवादाचा पुल म्हणून काम करावे. केवळ अभ्यासच नाही तर क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्नशील रहावे, शैक्षणिक समस्या, परीक्षा व अन्य उपक्रमांबाबत यथोचित माहिती घेऊन प्रशासनाकडे सादर करण्याचे काम करावे असे त्यांनी सांगितले.

याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८ कलम २३(२)(टी) नुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेद्वारे धुळ्याचे हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दराडे उत्तरेश्वर बळीराम, अमरावतीचे श्री गुरुदेव आयुर्वेद
महाविद्यालयाचा महाजन निखिल राजेंद्र, नाशिकच्या एसएमबीटी आयुर्वेद
मेडिकल महाविद्यालयाचा निबांळकर पियुष संजय या तीन सदस्यांची
विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झालेली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८ अन्वये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी संगमनेर येथील वामनराव इथापे होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालयाचा वाकचौरे अभिजीत भास्कर यांची निवड झाली आहे तसेच उपाध्यक्षपदी अंबेजोगाई येथील एसआरटीआर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची कांबळे सुजाता लक्ष्मण आणि धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा नलावडे आदर्श अनिल यांची निवड झाली आहे. सचिवपदाकरीता संगमनेर येथील वामनराव इथापे नर्सिंग महाविद्यालयाचा कावळे चैतन्य दत्ता तसेच सहसचिव पदाकरीता बीड येथील एस के होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालयाचा औसारमळे भुषण गोविंदराव
यांची बिनविरोध निवड झाली आहे.

विद्यापीठ परिषद निवडणूकीकरीता उपस्थित सदस्यांना उपकुलसचिव महेंद्र कोठावदे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. विधी अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी मतदान प्रक्रियेची नियमावली विशद केली. तसेच आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी विद्यार्थी परिषदेतर्फे अपेक्षित असणाऱ्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेनंतर त्वरीत मतमोजणी करुन विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ राजेंद्र बंगाळ यांनी नवनिर्वाचित नावांची घोषणा केली.

सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय
अधिकारी डॉ राजेंद्र बंगाळ, मतमोजणी तज्ज्ञ म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे फुलचंद अग्रवाल, बाळासाहेब पेंढारकर, संदीप राठोड, डॉ आर टी आहेर उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेकरिता रंजीता देशमुख, शैलजा देसाई, महेश कुलकर्णी, राकेश पाटील, समाधान जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यापीठ अधिसभा व विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित सदस्यांचे विद्यापीठ परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *