
सोलापूर ः सांगली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या फिडेच्या रॅपिड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या सृष्टी मुसळे व श्रेयश इंगळे यांनी उल्लेखनीय कामगीरी करत फिडेच्या नुकत्याच जाहिर झालेल्या यादीनुसार सृष्टीने इलो १५७१ व श्रेयशने इलो १५२९ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आदी राज्यातील मातब्बर खेळाडू सहभागी झाले होते.

ज्ञान प्रबोधिनी बालविकास मंदिर मध्ये शिकत असलेल्या सृष्टीने नेत्रदीपक खेळत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त दीपक क्षीरसागर (इलो १४८६), पृथ्वीराज पाटील (इलो १४८६) यांना पराभूत केले तर मानांकित सिद्धी कर्वे (इलो १४८६), भरत पाटोळे (इलो १४८६) यांच्याशी बरोबरी साधत फिडे रॅपिड रेटिंग प्रकारात इलो १५७१ आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळविले. तसेच सेंट थॉमस स्कूल मध्ये शिकत असलेल्या श्रेयशने देखील आकर्षक खेळ करत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आशिष मोटे (इलो १४८६), रुचित मुके (इलो १४६१) यांना पराभवाचा धक्का दिला तर मानांकित हर्ष जाधवला (इलो १४८७) बरोबरीत रोखत इलो १५२९ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले.
सृष्टी व श्रेयशला आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त उदय वगरे, वैष्णवी बोंडगे तसेच आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सृष्टीला तिचे आईवडील भक्ती व नितीन मुसळे, मुख्याध्यापिका प्रविणाताई काळे यांचे तर श्रेयशला त्याचे आई वडील गायत्री व किरणकुमार इंगळे तसेच सेंट थॉमस स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर रॉबिन थेक्कथ यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
सृष्टी व श्रेयश यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, उद्योजक रवींद्र जयवंत, अतुल कुलकर्णी, नितीन काटकर, गोपाळ राठोड, संतोष पाटील, प्रशांत गांगजी, दीपाली पुजारी आदींनी कौतुक करत अभिनंदन केले.