१२ जुलै रोजी शहरात आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथे अस्मिता खेलो इंडिया वुमन्स सायकलिंग लीग जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन १२ जुलै रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित महिला सायकलपटू छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होणार असून ही लीग ३ गटांमध्ये होणार आहे.
सबज्युनिअर १०-१६ वर्ष, ज्युनिअर मुली १६-१८ वर्ष, सिनीअर मुली १८-३५ वर्ष अशा वयोगटात सायकलिंग खेळात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित सायकलपटूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी संधी मिळवून देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांसाठी सायकल स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंसह क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सायकलींग महासंघ, खेलो इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, स्पीड सायकलिंग स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे व जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावे असे आवाहन स्पीड सायकलिंग स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुगे यांनी केले. आवश्यक त्या सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून सुरक्षे पासून ते वैद्यकीय सुविधेबाबत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे सचिव भिकन अंबे (9422203319) यांच्याशी संपर्क साधावा.
या सर्व स्पर्धा सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रा संजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत. तसेच ऑफिशियल म्हणून साईनाथ थोरात, साई अंबे, गणेश बनसोडे ही भूमिका पार पाडतील.