
मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने नुकतेच एल जे ट्रेनिंग सेंटर, दादर, मुंबई – २८ येथे राज्यस्तरीय पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक, राज्य व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३५ पंचांनी सहभाग नोंदविला होता. आंतरराष्ट्रीय पंच परविंदर सिंग, अजित सावंत व केतन चिखले यांनी पंचांना मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनात राज्यातील पंचांना कॅरमच्या नियमांची माहिती व त्यातील बारकावे समजून सांगण्यात आले. शिवाय केतन चिखले यांनी कॅरम बोर्डवर पंचांना येणाऱ्या प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी व समस्यांचे समाधान केले. परविंदर सिंग यांनी त्यांना त्यांच्या कारकिर्दीत आलेले विविध अनुभव सांगितले. तर अजित सावंत यांनी स्थानिक व राज्य स्तरावर पंच म्हणून काम करणाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी प्रेरित केले. केतन चिखले यांनी शिबिरार्थींना नियमांची माहिती देताना त्यातील विविध पैलूंची माहिती दिली.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने राज्य कॅरम संघटना अशा शिबिराचे आयोजन करत असून पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये व राज्यात उत्कृष्ट पंच निर्माण व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. या शिबिरात आंतर राष्ट्रीय पंच रमेश चव्हाण, राष्ट्रीय पंच शुभल पडते, मंदार कासारे, समीर बेंद्रे व अन्य राज्य स्तरीय व स्थानिक पंच असे मिळून एकंदर ३५ पंच सहभागी झाले होते. शेवटच्या तासातील प्रश्न उत्तराच्या भागात सर्वानी उत्स्फूर्तपणे भाग घेतल्याने हे शिबीर रंगले. या प्रसंगी राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर यांच्या हस्ते शिबिरातील नॅन्सी सिक्वेरा, हेमंत पांचाळ, दीपक शिंदे, भगवान गधडे यांना उत्तेजनार्थ विशेष बक्षीस देण्यात आले.