रामभाऊ घोडके, नरेश म्हस्के, जे जे पाटील, संकेत सावंत, मंदिरा कोमकर यांना पुरस्कार जाहीर

  • By admin
  • July 8, 2025
  • 0
  • 67 Views
Spread the love

राज्य कबड्डी दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा, रायगड येथे १५ जुलै रोजी वितरण

मुंबई ः २५व्या महाराष्ट्र कबड्डी दिनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रामभाऊ घोडके यांना कबड्डी जीवन गौरव, जया शेट्टी, खासदार नरेश म्हस्के यांना कृतज्ञता, जे जे पाटील यांना श्रमयोगी कार्यकर्ता, तर संकेत सावंत, मंदिरा कोमकर यांना मधुसूदन पाटील व अरुणा साटम स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने प्रतिवर्षी कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचा १५ जुलै हा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने हा २५वा कबड्डी दिन जय मंगल कार्यालय, पांडवा देवी, पोस्ट पोयानाड, जिल्हा रायगड येथे साजरा करण्यात येणार आहे. रामभाऊ घोडके यांना कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव, जया शेट्टी, खासदार नरेश म्हस्के यांना कृतज्ञता, जे जे पाटील, प्रभाकर लकेश्री यांना रमेश देवाडीकर श्रमयोगी कार्यकर्ता, तर संकेत सावंत, मंदिरा कोमकर यांना मधुसूदन पाटील व अरुणा साटम स्मृती पुरस्कार राज्य कबड्डी संघटनेच्यावतीने मंगळवारी जाहीर करण्यात आले.

पत्रकार सुनील सपकाळ, विठ्ठल देवकाते यांना पुरस्कार
यंदाचे क्रीडा पत्रकार पुरस्कार मुंबई दैनिक पुढारीचे सुनील सपकाळ व पुणे दैनिक सामनाचे विठ्ठल देवकाते यांना जाहीर झाले. ज्येष्ठ खेळाडू म्हणून जीवन पैलकर (मुंबई शहर), ज्ञानेश्वर कुंभार (उपनगर), रवींद्र निळकंठ देसाई (ठाणे), नामदेव राठोड (हिंगोली), कुमुद कागलकर – परांडेकर (सांगली), भास्कर सूर्यवंशी (लातूर), चंद्रकांत काटे (पुणे), नलिनी खेडेकर – पवार (पुणे), दिलीप देवलकर (मुंबई शहर) यांना, तर ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून मंगेश गुरव (उपनगर), मंगेश मोरे (रत्नागिरी), प्रा. चंद्रकांत सातपुते (परभणी), प्रवीण दळवी (ठाणे), प्रकाश पवार (पुणे), तसेच ज्येष्ठ पंच म्हणून प्रकाश चव्हाण (मुंबई शहर), सुरेश जोशी (ठाणे), श्रीकांत चतुर (जळगाव), बळीराम सातपुते (अहिल्यानगर), नवनाथ भालेराव (परभणी), पद्माकर मदन (उपनगर) यांना जाहीर झाले.

मल्हारपंत बावचकर स्मृती पुरस्कार प्रत्येकी रोख पाच हजार पुण्याच्या अजित चौहान व रत्नागिरीच्या समरीन बुरोंडकर यांना जाहीर करण्यात आला. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याला गौरवांकित करण्यात येईल. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अमृत कलश असे पुरस्काराचे स्वरूप राहील. मधुसूदन पाटील व अरुणा साटम पुरस्कारा सोबत प्रत्येकी रोख रुपये दहा हजार देण्यात येतील. बाबाजी जामसंडेकर, मुकुंद (अण्णा) जाधव व कबड्डी महर्षी शंकरराव साळवी यांच्या स्मरणार्थ कुमार/ कुमारी, किशोर/किशोरी गटातील ३-३ खेळाडूंना प्रत्येकी रोख पाच हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल.

कबड्डी क्षेत्रात महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव मिळालेल्या शकुंतला खटावकर, शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या पंकज मोहिते, विराज लांडगे, अस्लम इनामदार, आकाश शिंदे, शंकर गदई, अंकिता जगताप, पूजा यादव यांचा सन्मान करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती संघनायिका सोनाली शिंगटे व खेळाडू आम्रपाली गलांडे यांचा देखील सन्मान होईल. असे एका परिपत्रकाद्वारे राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना कळविले आहे.

शिष्यवृत्ती धारक खेळाडू

किशोर गट : तुकाराम दिवटे (जालना), किशोर जगताप (परभणी), सारंग उंडे (नंदुरबार).

किशोरी गट : बिदिशा सोनार (नाशिक), सेरेना म्हसकर (उपनगर), यशश्री इंगोले (परभणी).

कुमार गट : आफताब मन्सूरी (ठाणे), अनुज गावडे (पुणे), समर्थ देशमुख (कोल्हापूर).

कुमारी गट : वैभवी जाधव (पुणे), वैष्णवी काळे (अहिल्यानगर), भूमिका गोरे (पुणे).

जगन्नाथ चव्हाण शिष्यवृत्ती – किशोर : मनीष काळजे (पुणे), किशोरी : सेजल काकडे (नाशिक).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *