
राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा
नाशिक ः राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि हरियाणा या राज्याच्या संघांनी लक्षवेधक कामगिरी नोंदवत सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिज जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डीएसएफ स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सातव्या चाईल्ड कप आणि १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १० वर्षे गटामध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सर्वात जास्त नऊ गुण प्राप्त करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या गटामध्ये आंध्र प्रदेश संघाने सहा गुणांसह उपविजेतेपद तर तेलंगणा संघाने पाच गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.या गटात मुलांमध्ये तेलंगाना संघाने आठ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पश्चिम बंगाल संघाने पाच गुण मिळवत उपविजेतेपद तर तामिळनाडू संघाने तीन गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
१२ वर्षे मिनी गटामध्ये मुलांच्या गटामध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून तब्बल १५ गुण मिळवत ओडिसा संघाला दहा गुणांनी मागे टाकत या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. ओडिशा संघाने पाच गुणांसह उपविजेतेपद तर दिल्ली संघाने चार गुण घेत तृतीय क्रमांक मिळविला.
१२ वर्षे मिनी गटामध्ये मुलींच्या गटामध्ये चांगलीच चुरस दिसून अली. या गटात पंजाबच्या संघाने अवघ्या एक गुणांच्या फरकाने आठ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद आपल्या नावे केले. या गटामध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून सात गुणांसह सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाविले , तर राजस्थान संघाने पाच गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातील खासदार भास्कर भगरे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे कार्याध्यक्ष शिवाजीराजे जाधव, कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, खजिनदार हेमंत पांडे, या स्पर्धेचे आयोजन प्रमुख अशोक दुधारे, नाशिक जिल्हा मराठा महासंघाचे युवा अध्यक्ष व्यंकटेश मोरे, आरती गायके, अशोक कदम, आनंद खरे, राजू शिंदे, राहुल वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाला. विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स आणि प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचे केंद्र आहे. त्यामध्ये खो-खो, कबड्डी, अॅथलेटिक्स हे खेळ शिकवले जातात. ग्रामीण, आदिवासी भागातील खेळाडूंना या खेळांबरोबरच तलवारबाजी हा खेळ शिकवल्यास त्यांना पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारता येईल. त्यासाठी तलवारबाजी या खेळाचा समावेश क्रीडा प्रबोधिनीमध्ये करावा यासाठी मी जोमाने प्रयत्त्न करून आदिवासी भागातील खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देईन असे सांगितले. यावेळी शिवाजीराजे जाधव, केशव अण्णा पाटील यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. अशोक दुधारे यांनी या प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन आनंद चकोर यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्त पाटील, सचिव राजू शिंदे, दीपक निकम, अशोक कदम, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ, प्रसाद परदेशी आणि सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
अंतिम निकाल
१० वर्षे मुली ः १. महाराष्ट्र, २. आंध्र प्रदेश, ३. तेलंगणा. १० वर्षे मुले ः १. तेलंगणा, २. पश्चिम बंगाल, ३. तामिळनाडू. १२ वर्षे मुली ः १. पंजाब, २. हरियाणा, ३. राजस्थान. १२ वर्षे मुले ः १. हरियाणा, २. ओडिशा, ३. दिल्ली.