
शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन, प्रशिक्षकांकरिता कार्यशाळा आयोजित होणार
जळगाव ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सन २०२५-२६ मध्ये करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा समन्वयकांची नियोजन बैठक ८ जुलै रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे घेण्यात आली.
या बैठकीत मागील वर्षीच्या स्पर्धांतील अडचणी, सुधारणा तसेच यंदाच्या स्पर्धांचे सुयोग्य नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. २५ जुलै २०२५ पर्यंत सर्व तालुकास्तरीय बैठका घेण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. यंदा सर्व क्रीडा स्पर्धांचे अर्ज, शुल्क, प्रमाणपत्र आदी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, ही सुविधा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
मैदानी क्रीडा स्पर्धांसाठी हर्डल्सची सुविधा सर्व तालुक्यांमध्ये पुरवण्यात येणार असून, निवडक शाळांमध्ये योगासन, सॉफ्टबॉल व खो-खो खेळांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. योगासनासाठी चंचल माळी, सॉफ्टबॉलसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक किशोर चौधरी तर खो-खोसाठी मीनल थोरात हे मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देतील. सर्व क्रीडा शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, त्यांना मोफत व खुला प्रवेश राहील.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व शाळा, विद्यालये व शैक्षणिक संस्थांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी उपस्थित शिक्षक व समन्वयकांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.
या बैठकीत ‘ट्रेन द ट्रेनर्स’ ही संकल्पना मांडून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चोपडा, यावल व रावेर या तालुक्यांमध्ये सातपुडा पर्वतरांगांमध्ये १०० किमी सायकल स्पर्धा, मॅरेथॉन घेण्याची नाविन्यपूर्ण कल्पनाही यावेळी सादर करण्यात आली.
या बैठकीस तालुका क्रीडा समन्वयक अजय जाधव (चाळीसगाव), आसिफ खान (जामनेर), सुनील वाघ (अमळनेर), युवराज माळी (रावेर), संदीप पवार (पारोळा), सचिन सूर्यवंशी (धरणगाव), राजेंद्र आल्हाट (चोपडा), संजीव वाढे (मुक्ताईनगर), गिरीश पाटील (पाचोरा), डॉ सचिन भोसले (भडगाव), मनोज पाटील (एरंडोल), प्रशांत कोल्हे (जळगाव), दिलीप सांगेले (यावल), प्रदीप साखरे (भुसावळ), संजय निकम (बोदवड) यांच्यासह जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जगदीश चौधरी, सचिन निकम, नितीन जंगम, विशाल बोडखे, सुरेश थरकुडे, मीनल थोरात, चंचल माळी, काजल भाकरे आदी उपस्थित होते.