
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरातील रहिवासी आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता सॉफ्ट टेनिसपटू ओम काकड याने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपली चमक दाखवली आहे. ओमने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे ओम काकड आज ओळखला जातो ‘गोल्डन बॉय’ आणि ‘चार्टर्ड अकाउंटंट’ (CA) म्हणून.
ओम काकड हा भारतासाठी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सॉफ्ट टेनिस खेळात प्रतिनिधित्व करत आला असून, त्याने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे त्याला “गोल्डन बॉय” म्हणून ओळखले जाते. आता त्याच्या या नव्या यशामुळे तो खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात आदर्श ठरला आहे.खेळ आणि शिक्षण यांचं एकत्रित यश म्हणजेच ओम काकड,” असं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे.
या यशाबद्दल ओम काकडने सांगितले की, “खेळामुळे मिळालेली शिस्त, सातत्य आणि कष्ट घेण्याची तयारीच मला सीएसारखी कठीण परीक्षा पास होण्यासाठी मदत झाली. दोन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन साधणे आव्हानात्मक असले तरी शक्य आहे, हे मी सिद्ध करू शकलो याचा आनंद आहे.”
ओमच्या या दुहेरी यशाबद्दल त्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक निलेश हारदे, मित्र आणि कुटुंबीयांनी अभिमान व्यक्त केला असून, सामाजिक माध्यमांवर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.