
मुंबई ः कबड्डी दिनाचे औचित्य साधून नागरिक सहाय्य केंद्रातर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत इनडोअर पाच-पाच चढायांची विनाशुल्क शालेय कबड्डी स्पर्धा ११ ते १५ जुलै दरम्यान साखळी पद्धतीच्या सामन्यांनी ४ गटात रंगणार आहे.
विजेतेपदाचा एलआयसी-आत्माराम मोरे चषक पटकाविण्यासाठी नामवंत १२ शालेय कबड्डी संघात वडाळा-पश्चिम येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहामध्ये मॅटवर चुरस होईल. ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा विरुध्द रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड यामधील उद्घाटनीय लढत कबड्डीप्रेमी संजय कदम, अश्विनीकुमार मोरे, ध्यैर्यशील जाधव, सूर्यकांत कोरे, गोविंदराव मोहिते, महेंद्र पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरू होईल.
साखळी सामन्यांमध्ये अ गटात समता विद्यामंदिर-घाटकोपर, सेंट जोसेफ हायस्कूल-उमरखाडी, अन्झा हायस्कूल-भायखळा; ब गटात ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड, कुमुद विद्यामंदिर इंग्लिश स्कूल; क गटात ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, महिला मंडळ हायस्कूल-कुर्ला, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी आणि ड गटात आर एन विद्यालय-दिवा, सीताराम प्रकाश हायस्कूल-वडाळा, सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव अशी शालेय कबड्डी संघांची गटवारी संयोजक लीलाधर चव्हाण यांनी जाहीर केली.
स्पर्धे दरम्यान शालेय खेळाडूंना राष्ट्रीय ख्यातीचे कबड्डी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, प्रशिक्षक एकनाथ सणस, प्रॉमिस सैतवडेकर, अविनाश महाडिक, सुनील खोपकर आदींचे मोफत मार्गदर्शन लाभणार आहे. स्पर्धेतील पहिल्या आठ संघांना आकर्षक चषक तसेच वैयक्तिक पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा गौरव होणार आहे.