
सदानंद मोहोळ संघाकडे १७८ धावांची आघाडी
देवधर चषक क्रिकेट स्पर्धा
सोलापूर : प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आणि दयानंद कॉलेज मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना संयोजित डी बी देवधर चषक क्रिकेट स्पर्धा सुरू असून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सदू शिंदे विरुद्ध हेमंत कानिटकर संघात दुसऱ्याच दिवशी शेवटच्या सत्रात संपला. सदू शिंदे संघाने ७ गडी राखून हा सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात सदानंद मोहोळ संघाकडे दुसऱ्या दिवस अखेर १७८ धावांची आघाडी आहे.
पार्क स्टेडियमवर २ बाद १३४ धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू करुन सदू शिंदे संघाने २०० धावा केल्या. त्यानंतर हेमंत कानिटकर संघाला १११ धावांवर रोखले आणि विजयासाठी गरजेच्या ५० धावा ३ गड्यांच्या मोबदल्यात केल्या. रवींद्र जाधव, अक्षय वाईकर आणि प्रशांत सोळंकी या फिरकीपटूंनी सामना जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली तर मुर्तझा ट्रंकवालाचे अर्धशतक हे आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरले.
तर दुसरीकडे सदानंद मोहोळ संघ १९४ धावा केल्यावर वसंत रांजणे संघाला केवळ १२९ धावांवर रोखले. दुसऱ्या दिवस अखेर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा सात बाद ११३ धावा केल्या असून कर्णधार अभिषेक पवारच्या दमदार नाबाद अर्धशतकामुळे १७८ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात सदानंद मोहोळ संघाचे ६ गोलंदाजांनी बळी घेत वसंत रांजणे संघाला केवळ १२९ धावांमध्ये गुंडाळले.