
मानस बुलानी एकेरीत चॅम्पियन, कृष्णा क्षीरसागर, अक्षत लछेटा दुहेरीत विजेते
जळगाव ः सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धा छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी वर्चस्व गाजविले. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या दिव्येश बागमार याने अंडर १४ मुलांच्या गटात एकेरीत उपविजेतेपद मिळवले. इंदर अग्रवाल आणि शिवा देवसरकर यांनी दुहेरीत तृतीय स्थान मिळवले.
अंडर १७ गटात दिव्यांश बैद आणि चिन्मय पाटीदार या जोडीने तृतीय क्रमांक मिळवला. अंडर १९ मुलांच्या गटात मानस बुलानी याने एकेरीत शानदार कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले. श्रेणिक संचेती याने तृतीय स्थान संपादन केले. कृष्णा क्षीरसागर व अक्षत लछेटा या जोडीने दुहेरीत विजेतेपद पटकावत स्पर्धा गाजवली.
या विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी खेळाडूंचै अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीष दास, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, जयेश बाविस्कर यांनी अभिनंदन केले आहे.