मुलुंड येथे दोन दिवस गिरीमित्र संमेलन 

  • By admin
  • July 11, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

मुंबई ः २२ वे गिरिमित्र संमेलन मुलुंड येथे १२ व १३ जुलै रोजी संपन्न होणार आहे. या संमेलनात प्रस्तरारोहणातील सुवर्णकाळ या अनुषंगाने विविध सादरीकरणे आणि आढावा अहवाल सादर करण्यात येणार आहेत.

सह्याद्री, गडकोट, हिमालय, निसर्ग आणि पर्यावरण हे आपल्या सगळ्यांचेच जिव्हाळ्याचे विषय. या विषयांना आपण विविध माध्यमातून मांडणार आहोतच. याशिवाय विविध संस्था आणि कार्यकर्त्यांचा सन्मान, त्यांच्या कारकीर्दीचा आढावा, प्रस्तरारोहण छायाचित्र प्रदर्शन, प्रस्तरारोहण फिल्म, एका ऐतिहासिक नाटकाची झलक, मुलाखत, गिर्यारोहण साहित्याचे विविध स्टॉल असे नेहमीचे आवडीचे विषय आहेतच शिवाय डोंगर भटक्यांसोबत गळाभेट आणि गप्पा हेही आहेत.

 यंदाच्या २२ व्या संमेलनाची सहआयोजक संस्था आहे ‘दि नेचर लव्हर्स’, ५०व्या वर्षांत पदार्पण करणारी गिर्यारोहणातील एक अग्रगण्य संस्था. संमेलनात यावर्षी विशेष भर देण्यात येणार आहे सह्याद्रीतील प्रस्तरारोहण विषयावर आणि म्हणूनच प्रस्तरारोहण क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे अशा उत्तुंग प्रतिभेच्या पाहुण्यांना आपण संमेलनासाठी आमंत्रित केलं आहे.  
 
२२ व्या संमेलनाची प्रमुख अतिथी आहे प्रस्तरारोहण आणि आईस क्लायंबिंग मध्ये जागतिक स्तरावर आपला स्वतंत्र ठसा उमटवणारी जर्मनीची इनस पापर्ट. इनस पापर्ट ही आईस क्लायंबिंग जागतिक विजेती असून एम-११ च्या मिक्स क्लायंबिंग ग्रेडचे आरोहण करणारी जगातील पहिली महिला आहे. तसेच ८-बी ग्रेडचे क्लायंबिंग करणारी प्रस्तरारोहक महिला आहे. नोज रूटने अल कॅपिटनच्या उभ्या प्रस्तर भिंतीवर आरोहण करणारी महिला देखील आहे. 
 
२२ व्या संमेलनाचे विशेष अतिथी म्हणून अतिउंचावरील हिमशिखरांवर मदत व बचाव कार्य करणारे नेपाळ मधील लक्पा शेर्पा हे उपस्थित राहणार आहेत. लक्पा शेर्पा हे हेलिकॉप्टर लॉंग लाईन रेस्क्यू स्पेशालिस्ट, एव्हरेस्ट-इआर क्लिनिक समन्वयक आहेत. तसेच हिमालयन रेस्क्यू असोसिएशनच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पचा बेस कॅम्प मॅनेजर देखील आहेत. एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, धवलगिरी, नुप्त्से या अतिउंच शिखरांवरील आव्हानात्मक जागेवर अडकलेले डझनभर जीव वाचवले आणि मृतदेह बाहेर काढले आहेत. बेस कॅम्पवर २३ हंगाम कार्यरत राहिले (१७००० फूट उंचीवर ४ वर्षांहून अधिक काळ) आहेत.  

संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत उमेश झिरपे. आठ अष्ठहजारी मोहिमांचे यशस्वी नेतृत्व करणारे एकमेव नेता, तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत. 
 
यावर्षी संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे, प्रस्तरा रोहणातील सुवर्णकाळ!
या अनुषंगाने विविध सादरीकरणे आणि आढावा अहवाल सादर करण्यात येतील. यात प्रस्तरारोहण फिल्म सादरीकरण, प्रस्तरारोहण छायाचित्र प्रदर्शन असणार आहे. गिरिमित्र संमेलनात प्रस्तरारोहण आणि हिमालय मोहिमा, बचाव (रेस्क्यू) व मदत मोहिमा, दुर्ग संवर्धन मोहिमा (निवडक) याचा विशेष आढावा घेतला जाणार आहे. हे सगळं अनुभवयाला, ऐकायला, बघायला भेटूया १२-१३ जुलै रोजी आपल्या नेहमीच्या हक्काच्या ठिकाणी अशी माहिती संमेलन प्रमुख अभिषेक गुरव यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *