
मुंबई ः ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (१२ जुलै) दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे होणार आहे.

महाराष्ट्राने भारताला अनेक महान कबड्डीपटू दिले. त्यापैकी आपल्या चतुरस्त्र खेळाने मैदान गाजविणाऱ्या अनेक कबड्डीपटूंच्या व्यक्तिरेखा संदर्भ ग्रंथात सापडतील. कबड्डी खेळाडूंबरोबरच या खेळाचे संघटक आणि कबड्डीला भरघोस प्रसिद्ध देणारे पत्रकार, तसेच या खेळाचे पोशिंदा असलेल्या शरद पवार यांच्या व्यक्तिरेखा देखील या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डीची शैली किती दर्जेदार व नेत्रदीपक होती, याचे वर्णन सदर ग्रंथातील खेळाडूंच्या व्यक्तिरेखांमध्ये आढळते.
महाराष्ट्रातील कबड्डीच्या प्रांतातले चढाईचे वतनदार, तसेच पकडी करणारे शिलेदार आणि उत्तम डावपेत लढविणारे कर्णधार यामध्ये आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडापासून ते अलीकडच्या काळातील कबड्डीपटू या संदर्भ ग्रंथात आढळतील. हुतूतू या खेळाची वेस ओलांडून कबड्डीच्या प्रांतात दाखल झालेले अनेक चढाई व पकडीच्या प्रांतातले वतनदार खेळाडू, या संदर्भ ग्रंथात आहेत. पुरुषांच्या या मर्दानी खेळात महाराष्ट्राच्या महिला रणरागिणी ही कमी नव्हत्या; हे या ग्रंथातील महिला खेळाडूंचा वर्णन वाचताना लक्षात येईल. महाराष्ट्राला वर्चस्वाचे सोनेरी दिवस दाखवणाऱ्या अनेक महिला खेळाडूंच्या व्यक्तिरेखा देखील या ग्रंथात चितारल्या गेल्या आहेत. कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीतील समाविष्ट असणाऱ्या ८१ जणांच्या व्यक्तिरेखा अनेकांना स्फूर्तीदायक ठरतील.
शनिवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सदर व संदर्भ ग्रंथात असणारे अनेक अर्जुन पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच अन्य पुरस्कार विजेते खेळाडू देखील उपस्थित राहणार आहेत. या सर्व खेळाडूंच्या प्रकट मुलाखती थेट कार्यक्रमाच्या आधी पाहता येतील. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कबड्डीपटू व समालोचक राणाप्रताप तिवारी हे या प्रकाशन समारंभ सुरू होण्याआधी या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर खासदार शरद पवार यांच्या हस्ते कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होईल. त्यावेळी जेष्ठ साहित्यिक आणि संपादक तसेच माजी खासदार कुमार केतकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. आत्माराम मोरे प्रतिष्ठानच्या वतीने या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. काही संकेतस्थळांवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ही पाहता येईल.