
मुंबई ः कबड्डी दिनाचे औचित्य साधून नागरिक सहाय्य केंद्र-ज्ञानेश्वर विद्यालयातर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत इनडोअर पाच-पाच चढायांच्या विनाशुल्क शालेय कबड्डी स्पर्धेत अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा, रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड आदी शालेय संघांनी साखळी सामने जिंकले.
अतिशय अटीतटीच्या सामन्यात अँटोनियो डिसोझा हायस्कूलने सेंट जोसेफ हायस्कूलचा १५-१४ असा निसटता पराभव केला आणि साखळी गुण वसूल केला. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू अर्णव पवार व समर्थ चोचे यांना विशेष पुरस्कार देऊन कबड्डीप्रेमी अश्विनीकुमार मोरे, करण नागपाल, सुर्यकांत कोरे, महेंद्र पाटील, लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहामध्ये मॅटवर झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यात रोझरी हायस्कूलने बलाढ्य ज्ञानेश्वर विद्यालयाचा १६-८ असा पराभव केला. संस्कार सिंघ व आराध्य रोकडे यांच्या खोलवर चढाया रोझरी हायस्कूल संघाला विजयासाठी उपयुक्त ठरल्या. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या क्षितीज पेडणेकरने छान खेळ केला. अ गटातील साखळी सामन्यात समता विद्यालयाने अर्णव कदम व प्रीतम पांडे यांच्या चौफेर चढायांमुळे डिसोझा हायस्कूल संघाला २३-१४ असा पराभव पत्करावा लागला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, प्रशिक्षक एकनाथ सणस, प्रॉमिस सैतवडेकर, सुनील खोपकर, माजी कबड्डीपटू दशरथ शिंदे व भरत शिंदे यांनी शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेतील पहिल्या आठ संघांना आकर्षक चषक तसेच वैयक्तिक पुरस्कार दिले जाणार आहेत.