
जळगाव : आंतर शालेय सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेत लॉर्ड गणेशा जामनेर संघाने अंडर १५ वयोगटात विजेतेपद पटकावले. स्वामी विवेकानंद स्कूल संघाने उपविजेतेपद संपादन केले.
गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरू आहे. १५ वर्षाखालील जिल्हास्तरीय स्पर्धेत लॉर्ड गणेशा जामनेर संघाने स्वामी विवेकानंद अमळनेर या शाळेचा २-१ पराभव करीत विजेतेपद पटकविले. स्वामी विवेकानंद संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तृतीय स्थानासाठी झालेल्या स्पर्धेत शानबाग सावखेडा संघाने पेनल्टी मध्ये सेंट अलायसेस भुसावळ संघाचा ५-४ ने पराभव करीत शानबाग संघ तृतीय स्थानी राहिला.
१७ वर्षे आतील मुली मनपा व उर्वरित या दोन्ही गटातील स्पर्धा सुरू होणार असल्याचे स्पर्धा आयोजन समितीचे सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
विजयी व उपविजयी संघांना पारितोषिक
१५ वर्षांखालील जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते व उपविजेत्या संघातील खेळाडूंना स्पोर्ट्स हाऊस जळगावतर्फे सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू योगेश धोंगडे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता इब्राहिम मुसा पटेल, फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, क्रीडा अधिकारी सचिन निकम यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी वसीम रियाज यांचे नेतृत्वात राहील अहमद, तौसिफ शेख , वसीम चांद, साबीर अहमद, अरबाज खान, अनस शेख, पंकज तिवारी, उदय फालक आदींनी पुढाकार घेतला होता.