
सोलापूर : ‘आजच्या युगामध्ये स्वसंरक्षणासाठी मुला-मुलींनी युनिफाईट खेळासारख्या मार्शल आर्ट प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. जगात ८४ देशांमध्ये व भारतामध्ये २४ राज्यांतून हा खेळ खेळला जात आहे. अशा खेळामधून खेळाडूंनी आपले भवितव्य घडवून आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे व राष्ट्राचे तसेच पालकांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे, अशी अपेक्षा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली.
१२व्या राज्य अजिंक्यपद युनिफाईट स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संतोष पवार व उद्योजक मुकुंदराव जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. यावेळी राज्य युनिफाईट संघटनेचे अध्यक्ष संतोष खंदारे, महासचिव मंदार पनवेलकर, जिल्हा युनिफाईट सचिव भीमराव बाळगे, खजिनदार इक्बाल शेख आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत धनंजय धेंडे, मनोज बाळगे, प्रचिता जोगदांडे, पौर्णिमा पुजारी यांनी केले.
भारतीय शालेय क्रीडा महासंघ मान्यताप्राप्त भारतीय युनिफाईट महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन व सोलापूर जिल्हा युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूट येथे ही स्पर्धा झाली.