
एलआयसी-आत्माराम मोरे कबड्डी स्पर्धा
मुंबई ः कबड्डी दिनाचे औचित्य साधून नागरिक सहाय्य केंद्रातर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत इनडोअर पाच-पाच चढायांच्या एलआयसी-आत्माराम मोरे चषक शालेय कबड्डी स्पर्धेत रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड व ज्ञानेश्वर विद्यालयाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी व आर एन विद्यालय-दिवा शालेय कबड्डी संघांनी देखील उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामनावीर आराध्य रोकडे व कप्तान संस्कार सिंघ यांच्या दोन्ही डावातील अप्रतिम चढायामुळे रोझरी हायस्कूलने प्रथमपासून वर्चस्व राखत अँटोनियो डिसोझा हायस्कूलचे आव्हान १८-१५ संपुष्टात आणले. आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहामध्ये मॅटवर शालेय संघांच्या दर्जेदार लढती रंगत आहेत.

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीचा ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा विरुध्द समता विद्यामंदिर-घाटकोपर यामधील सामना सुवर्ण चढाईपर्यंत रंगला. दोन्ही संघांनी तोडीस तोड चढाया करून सामना १४-१४ अशा बरोबरीत राखला. सुवर्ण चढाईच्या खेळाडूची ज्ञानेश्वर विद्यालयाच्या क्षेत्ररक्षकांनी यशस्वी पकड करीत १५-१४ असा विजय संपादन केला. चढाईपटू शिवम आव्हाड, ईशान सय्यद, आराध्य रोकडे, जतीन साळुंखे आदी सामन्यामधील उत्कृष्ट खेळाडूंना माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, मुख्याध्यापक महेंद्र पाटील, मार्गदर्शक प्रॉमिस सैतवडेकर, सुनील खोपकर, चंद्रकांत करंगुटकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. राष्ट्रीय प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी तसेच प्रशिक्षक एकनाथ सणस, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले.
आर एन हायस्कूल-दिवा संघाने साई सावंत, सत्यम मंडल, जय सावंत यांच्या चौफेर चढायांमुळे प्रथमपासून विजयी मुसंडी मारत ताराबाई मोडक हायस्कूल संघाला १८-१३ असे चकविले आणि एलआयसी-आत्माराम मोरे चषक शालेय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. ताराबाई मोडक शाळेचे स्वरूप कडू, ओम माने, अनिश पोळेकर यांनी छान खेळ केला. तत्पूर्वी साखळी क गटात हशू अडवाणी स्कूल व ताराबाई मोडक हायस्कूल तर ड गटात आर एन हायस्कूल-दिवा व सीताराम प्रकाश हायस्कूलने गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकाविले. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना कबड्डी प्रेमी अरुण माने, नितीश रूमने, राष्ट्रीय खेळाडू रमाकांत शिंदे, ज्येष्ठ पत्रकार क्रीडा सुहास जोशी, अविनाश महाडिक, सुनील खोपकर, मुख्याध्यापक महेंद्र पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.