
घातक गोलंदाजी करत नोंदवला एक नवा विक्रम
जमैका ः सबीना पार्क येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने चेंडूने कहर केला. स्कॉट बोलंडने हॅटट्रिक घेण्याचा महान पराक्रम करून कसोटी क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली.
बोलंडच्या या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात यजमान वेस्ट इंडिजला २७ धावांत गुंडाळण्यात यशस्वी झाला. अशाप्रकारे, वेस्ट इंडिजने १९५५ नंतर कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येत सर्वबाद होण्याचा लज्जास्पद विक्रम नोंदवला.
स्कॉट बोलंडने फक्त २ षटकांत २ धावा देऊन सलग ३ चेंडूंत ३ बळी घेण्याचा महान पराक्रम केला. यासोबतच, बोलंडने डे/नाईट पिंक बॉल कसोटीत हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज बनून इतिहास रचला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात तीन बळी घेणाऱ्या बोलंडने एका मेडन ओव्हरसह दोन षटकांत हॅटट्रिक घेतली.
बोलँडचे नाव एका खास क्लबमध्ये समाविष्ट
वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील १४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने जस्टिन ग्रीव्हजला ११ धावांवर बाद केले, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शमर जोसेफला गोल्डन डकवर बाद केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने तिसऱ्या चेंडूवर जोमेल वॉरिकनला बाद करून हॅटट्रिक घेत विक्रम रचला. स्कॉट बोलँड हा कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा १० वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. त्याचबरोबर, तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात असे करणारा जगातील सहावा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी, जसप्रीत बुमराह, नसीम शाह, केशव महाराज, गस अॅटकिन्सन आणि नोमान अली यांनी वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेण्याचे चमत्कार केले होते.
.