
नाशिक ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच दैनंदिन वेतनावरील कर्मचारी यांच्याकरीता ’ताणतणाव व्यवस्थापन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.देवेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर आदी अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, आजच्या वेगवान जीवनात तणाव ही एक अटळ बाब बनली आहे. शिक्षण असो, करिअर असो किवा वैयक्तिक जीवन असो, प्रत्येक स्तरावर आपल्याला ताणतणावांना सामोरे जावे लागते. यावर योग्य वेळी नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करु शकते असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी सांगितले की, केवळ शैक्षणिक उत्कृष्टता नाही, तर कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे. या ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेने आपल्याला तणावाची कारणे ओळखण्यास, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत केली आहे. मानसिक आरोग्य हेच यशाचे गमक आहे आणि निरोगी मनच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करते. धावत्या जीवनशैलीमुळे आपल्याला मोठया प्रमाणात मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्याचे निवारण करण्यासाठी विद्यापीठात चिकित्सा मानसतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष उपक्रमाद्वारे चिकित्सा मानसतज्ज्ञ मानसी हिरे यांनी सांगितले की, आपण सर्वांनी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. एक निरोगी आणि तणावमुक्त वातावरणच आपल्याला आपली पूर्ण क्षमता वापरण्याची संधी देते. ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध तंत्रे, जसे की माइंडफुलनेस, श्वासोच्छवास व्यायाम, वेळेचे नियोजन, मानसिक आरोग्य, त्याचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांचे आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर यांनी मानले. या कार्यशाळेस विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.