
ठाणे ः आजच्या धावपळीच्या युगात मानसिक आरोग्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. चिंता, नैराश्य, एकटेपणा अशा मानसिक समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा वेळी स्वतःला अर्थपूर्ण पद्धतीने कामात गुंतवणे ही मानसिक आरोग्य सुधारण्याची प्रभावी स्व-उपचार पद्धत ठरते, असे मानसशास्त्र सांगते असे प्रतिपादन स्पोर्ट्स प्लस दैनिकाचे सहाय्यक संपादक प्रमोद वाघमोडे यांनी येथे केले.
जी माणसं स्वतःला तऱ्हेतऱ्हेच्या कामांत – जसे की छंद, समाजसेवा, वाचन, लेखन, व्यायाम, हस्तकला यात गुंतवून घेतात. त्यामुळे त्यांना दुःख कमी जाणवतात. कारण मेंदू जेव्हा सतत काहीतरी अर्थपूर्ण काम करत असतो, तेव्हा तो नकारात्मक विचारांवर लक्ष देत नाही. ही प्रक्रिया मानसशास्त्रात “डायव्हर्जन थेरपी” म्हणून ओळखली जाते.
एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे, जे लोक सतत रिकामेपणात राहतात किंवा भूतकाळातील विचारात अडकतात, त्यांना नैराश्य व चिंता अधिक जाणवते. याउलट, जे लोक स्वतःला सकारात्मक उपक्रमांमध्ये गुंतवतात, त्यांचं भावनिक नियंत्रण अधिक चांगलं असतं आणि ते स्ट्रेस अधिक परिणामकारकपणे हाताळू शकतात.
जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मिहाय चिक्सेंटमिहाय यांनी मांडलेली फ्लो स्टेट ही संकल्पना याला पूरक आहे. म्हणजेच, जेव्हा व्यक्ती एखाद्या कार्यात पूर्ण मनोभावे गुंतते, तेव्हा तिला काळाचा विसर पडतो आणि मानसिक समाधान व प्रेरणा मिळते. ही स्थिती मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते.
व्यायाम आणि शारीरिक हालचालीमुळे डोपामिन, सेरोटोनिन हे ‘हॅप्पी हार्मोन्स’ नैसर्गिकरित्या स्रवत असतात, जे मानसिक आरोग्य सुधारतात. झोपही अधिक शांत आणि सखोल होते. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास “स्वतःच्या अस्तित्वाचं भान” निर्माण होतं, जे नैराश्यापासून दूर ठेवतं.
परंतु ही व्यस्तता फक्त वेळ घालवण्यासाठी नसावी, तर ती अर्थपूर्ण, समाधान देणारी असावी, याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. निष्कर्षतः, स्वतःला निरनिराळ्या सकारात्मक उपक्रमांमध्ये गुंतवणं हे केवळ वेळ घालवणं नसून, मानसिक आरोग्य टिकवण्याचं प्रभावी आणि सुलभ साधन आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन आयुष्यात हे तत्व अंगीकारणे ही काळाची गरज आहे असे प्रमोद वाघमोडे यांनी सांगितले.