ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंची जोरदार कामगिरी 

  • By admin
  • July 18, 2025
  • 0
  • 187 Views
Spread the love

शारव, शौनक, निया, रेवांतला विजेतेपद 

ठाणे ः आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचा जोरदार झंझावात पहावयास मिळाला. शारव शहाणे, शौनक श्रृंगारपुरे, निया घायाळ, रेवांत मोरे यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.

यंदाच्या बॅडमिंटन हंगामातील सुरवातच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीसाठी धडाकेबाज ठरली आहे. ठाणे महापालिका व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने चालवली जाणारी आणि सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजना या आंतर शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर ठरली आहे.

ही स्पर्धा सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या सौजन्याने अत्यंत भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. ४३ हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवलेला असतानाही ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचा प्रबळ ठसा उमटवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्यात निया कारखानिस (सुलोचनादेवी सिंघानिया शाळा) हिने आपल्या वर्गवारीतील सर्व सामन्यांत वर्चस्व राखत अंतिम सामन्यात १५/८, १२/१५, १५/२ अशी थरारक मात देत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तिचा खेळ पाहताना कोर्टवर तिच्या आत्मविश्वासाची, तयारीची आणि संधीचं सोनं करण्याच्या वृत्तीची झलक प्रत्येक गुणात उमटत होती.

उपांत्य सामन्यात शाळा एकच, पण आमनेसामने होते दोन मातब्बर शारव शहाणे आणि शौनक गायल. या सामन्यात शारवने १५/११, १६/१४ असा सामना जिंकत आपली फाईनलची सीट पक्की केली. त्याच वेळी अन्वी मोरे हिनेही दमदार खेळ करत उपांत्यपूर्व फेरीत तगड्या प्रतिस्पर्ध्याला हरवत स्पर्धेची रंगत वाढवली. रेवंत श्रृंगारपुरे याने तर आपल्या वयोगटात उत्कृष्ट खेळ करत सोन्याची चमक अधिक तेजस्वी केली.

ही स्पर्धा खेळाडूंना व्यासपीठ, आत्मविश्वास आणि चुरस देणारी ठरली, तर तिचे यशस्वी आयोजन हे स्पोर्ट्स हेड सुनील पवार यांच्या कुशल नियोजनामुळे आणि मॅच रेफरी सौरभ प्रधान यांच्या अचूक निर्णयक्षमतेमुळे अजूनच प्रतिष्ठित झाले.
ही पदकं म्हणजे केवळ सन्मान नाहीत, तर ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या प्रशिक्षणातील गुणवत्ता, खेळाडूंची मेहनत आणि असोसिएशनच्या बांधिलकीचे फलित आहेत. या सर्व यशस्वी खेळाडूंना ठाणेकर  क्रीडामित्रांच्या आणि असोसिएशनच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *