
ठाणे ः सीएट प्रस्तुत योनेक्स सनराईज ३८वी ठाणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५–२६ पुन्हा एकदा जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात जुनी, सर्वात गौरवशाली आणि प्रत्येक खेळाडूसाठी मानाची मानली जाणारी स्पर्धा यंदाही भव्यतेने पार पडणार आहे. ही स्पर्धा ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या आयोजनाखाली आणि ठाणे महानगरपालिकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली आहे.
या वर्षीची ही बहुप्रतीक्षित स्पर्धा २८ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान खारटन रोडवरील दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. २८ जुलैपासून ते ३१ जुलैपर्यंत ज्युनिअर गटातील सामने रंगणार आहेत. यात अंडर ९ (फक्त सिंगल्स), अंडर ११, १३, १५ आणि १७ वयोगटात मुला-मुलींचे सिंगल्स, डबल्स आणि मिक्स डबल्स (फक्त १५ आणि १७ गटात) अशा विविध प्रकारात हे सामने रंगतील.
यानंतर, १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टदरम्यान सिनीअर गटातील सामन्यांची धग अनुभवायला मिळणार आहे. यात अंडर १९, ओपन मेन्स आणि विमेन्स सिंगल्स व डबल्स, मिक्स डबल्स, आणि वय ३५ वर्षांवरील खेळाडूंकरिता कॉम्बाइन्ड ८०+, ९०+ आणि १००+ डबल्स प्रकारांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२५ असून, प्रवेश अर्ज www.mbasso.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वीकारले जातील. सर्व सामन्यांचे ड्रॉ आणि वेळापत्रक याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. तरी अधिक माहितीसाठी मयूर घाटणेकर (9619711171), संदीप कांबळे (9004181388), राजीव गणपुले (9320410490) आणि रोहन साळवी (8369731221) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ठाण्याच्या खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा म्हणजे एक सुंदर आणि तगड्या स्पर्धेचा सोहळा ठरणार आहे.