ठाण्याच्या प्रशांत दळवीची राज्य पंच परीक्षेत बाजी
सातारा : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे २०२५-२६ या वर्षासाठीचे राज्यस्तरीय खो-खो पंच शिबिर १९ व २० जुलै रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन सातारा जिल्हा अॅम्युएचर खो-खो असोसिएशनच्या संयोजनाने करण्यात आले असून, कार्यक्रमाचे आयोजन सातारा एसटी स्टँडच्या पाठीमागे असलेल्या हॉटेल निर्मल येथे होणार आहे.
या दोन दिवसीय शिबिरामध्ये पूर्णवेळ सहभागी होणाऱ्या आणि पात्र ठरलेल्या पंचांनाच आगामी राज्य स्पर्धांसाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या इच्छुक पंचांनी अधिक माहितीसाठी महेंद्र गाढवे (९८२२५४४३७०) अथवा प्रशांत कदम (९७३०४५२३११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व सरचिटणीस डॉ चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या राज्य पंच परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, राज्यातील ४८० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व उत्तीर्ण परीक्षार्थी साताऱ्यातील शिबिरात सहभागी होणार आहेत. या परीक्षेत ठाण्याच्या प्रशांत प्रभाकर दळवी याने प्रथम क्रमांक पटकावत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यानंतर लातूरच्या दिक्षा सुरेश सालमोटे हिने द्वितीय, तर पुण्याच्या ओंकार सुरेश ढवळे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
उत्तीर्ण परीक्षार्थ्यांची केंद्रनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे : अहिल्यानगर – २०, बीड – ३९, धुळे – ३२, जालना – ३१, लातूर – २७, मुंबई – २८, नांदेड – २५, नंदुरबार – ३३, पालघर – ३५, पुणे – ७८, सांगली – २५, सोलापूर – ५०, सिंधुदुर्ग – २२, ठाणे – ३५.