
खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत ः विजय दर्डा
पुणे ः महाराष्ट्र टेनिक्वाइट (रिंग टेनिस) असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे नुकतीच संपन्न झाली. या सभेत नव्या वर्षातील स्पर्धांचे कॅलेंडर, बजेट मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र टेनिक्वाइट (रिंगटेनिस) असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा वरद श्री सभागृह, बाजीराव रोड, पुणे येथे संपन्न झाली. या सभेस कोल्हापूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, नागपूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, जालना, नवी मुंबई, अकोला, धुळे इत्यादी २८ जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र टेनिक्वाइट (रिंग टेनिस) असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दादा जोशी व कार्याध्यक्ष डॉ विजय दर्डा यांच्या उपस्थितीत सभेची सुरुवात झाली. सभेमध्ये वर्ष २०२४-२५ यावर्षी संपन्न झालेल्या राज्य स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा यांचा आढावा घेण्यात आला. तसेच वर्षाच्या ऑडिटेड अकाउंट्सला मंजुरी देण्यात आली.
वर्ष २०२५-२६ वर्षाचे बजेट मंजूर करण्यात आले. वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेचे कॅलेंडर तयार करण्यात आले. डॉ विजय दर्डा यांनी सभेस संबोधित करताना त्यांनी आपल्याला या खेळाला उज्वल भविष्य मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, यासाठी कसलीही आवश्यकता असल्यास मी सदैव तयार आहे असे सांगितले. अध्यक्ष मोहनदादा जोशी यांनी सर्व जिल्हा सचिवांचे अभिनंदन करून यापुढे खेळास तालुकास्तरावर प्रसार करून खेळाची व्याप्ती वाढवण्याच्या सूचना केल्या. सचिव अनिल वर्पे यांनी वर्ष २०२४-२५ अहवाल वाचन केले. येणाऱ्या वर्षातील खेळापुढील आव्हाने आणि त्यावर मात करण्याचे उपाय यावर सर्व सभासदांनी सखोल चर्चा केली व खेळीवेळीच्या वातावरणात सभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.