जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन २५ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करावा

  • By admin
  • July 20, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

जागतिक जलतरण साक्षरतेचे संकल्पक राजेश भोसले यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर ः २५ जुलै हा जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन (World Drowning Prevention Day) म्हणून जगभर साजरा केला जातो. प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा असे आवाहन जागतिक जलतरण साक्षरतेचे संकल्पक, एमजीएम स्पोर्ट्स कल्बचे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी केले आहे.

जगभरात दरवर्षी पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता युनायटेड नेशनने २५ जुलै हा दिवस World Drowning Prevention day म्हणजे जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन म्हणून जाहीर केला आहे. पाण्यात बुडून होणाऱ्या अपघाती मृत्यूंकडे  आणि या धोक्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधने व असे अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करणे हा या मागचा उद्देश आहे, असे राजेश भोसले यांनी सांगितले.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकृत सर्वेक्षणाच्या पाहणीनुसार जगभरात दरवर्षी अडीच लाख लोक पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडतात. म्हणजेच दररोज जगभरात ६५० लोकांचा मृत्यू हा पाण्यात बुडाल्यामुळे होतो. अतिमहत्वाचे म्हणजे यात सर्वाधिक प्रमाण हे शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणांचे आहे  ही अतिशय चिंताजनक बाब आहे. म्हणजेच जगभरातील रोखता येणाऱ्या अपघाती मृत्यूंपैकी ३३ टक्के मृत्यू पाण्यात बुडून होतात.  भारतामध्ये सुद्धा याचे मोठे प्रमाण आहे असे राजेश भोसले यांनी सांगितले.

भारतात मोठे प्रमाण
भारतात दरवर्षी साधारण पन्नास ते साठ हजार जणांचा मृत्यू हा पाण्यात बुडून होत असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. १ ते १५ वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी तसेच २५ वर्षांपर्यंतच्या महाविद्यालयीन तरुणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

या किशोरवयीन मुलांना व तरुणांना पोहण्याचे व पाण्याचे प्रचंड आकर्षण असते. प्रत्येकाला पोहण्याची नैसर्गिक ओढ व आवड असते. अशा सर्व विद्यार्थ्यांना तरणा पूर्वी जल व जलस्त्रोतांची संपूर्ण माहिती आपण उपलब्ध करून दिल्यास, त्यांचे धोके लक्षात आणून दिल्यास, आपल्याला आपल्या भावी पिढीचे प्राण वाचविता येतील म्हणून प्रत्येक शैक्षणिक संस्थान, प्रतिष्ठाण, क्रीडा संकुलात, शाळा-महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात निरंतर World Drowning Prevention Day साजरा करून प्रत्येक विद्यार्थ्याला जलतरण साक्षर व जलतरण जागृत करावे असे आवाहन जागतिक जलतरण साक्षरतेचे संकल्पक एमजीएम स्पोर्ट्स कल्बचे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *