
किंगस्टन ः यजमान वेस्ट इंडिज संघाला ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने टी २० मालिकेचीही धमाकेदार सुरुवात केली आहे. किंग्स्टनमधील सबिना पार्क येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी २० सामन्यात, पदार्पण करणाऱ्या मिचेल ओवेनच्या वादळी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ३ विकेट्सने पराभव केला.
मिचेल ओवेनने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच टी २० सामन्यात शानदार अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. अशाप्रकारे, त्याने रिकी पॉन्टिंग आणि डेव्हिड वॉर्नरच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले.
मिचेल ओवेन हा टी २० सामन्यात पदार्पणात अर्धशतक झळकावणारा फक्त तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी फक्त रिकी पॉन्टिंग आणि डेव्हिड वॉर्नरनेच ही मोठी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियासाठी टी २० सामन्यात पदार्पणात तिसरा सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रमही ओवेनच्या नावावर आहे. २३ वर्षीय मिचेल ओवेनने फक्त २७ चेंडूत ५० धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने ६ गगनचुंबी षटकार मारले. ओवेनला कॅमेरॉन ग्रीनची पूर्ण साथ मिळाली. ग्रीनने २६ चेंडूत ५१ धावांची तुफानी खेळीही केली. त्याने त्याच्या डावात २ चौकार आणि ५ षटकार मारले.
ग्रीन आणि ओवेन यांनी ताकद दाखवली
ग्रीन आणि ओवेन यांच्या अर्धशतकांच्या मदतीने ऑस्ट्रेलिया १९० धावांच्या लक्ष्याजवळ पोहोचला. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव थोडा डळमळीत झाला, परंतु शेवटी, बेन द्वारशुइस आणि शॉन अॅबॉट यांच्यामुळे एक षटक शिल्लक असताना वेस्ट इंडिजचा ३ गडी राखून पराभव करण्यात यश आले. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजच्या संघाने २० षटकात ८ गडी गमावून १८९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेस (६०) आणि सलामीवीर शाई होप (५५) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून द्वारशुईसने ४ षटकांत ३६ धावा देत सर्वाधिक ४ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय
वेस्ट इंडिज दौऱ्यावरील ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा विजय आहे. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी, वेस्ट इंडिजला ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसरा टी २० सामना २२ जुलै रोजी सबिना पार्क येथे खेळला जाईल.
टी २० पदार्पणात ५० प्लस धावा करणारे ऑस्ट्रेलियन फलंदाज
डेव्हिड वॉर्नर ८९ (४३) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००९
जेक फ्रेझर-मॅकगर्क ५० (३१) विरुद्ध इंग्लंड, २०२४
मिशेल ओवेन ५० (२७) विरुद्ध वेस्ट इंडिज, २०२५