
पुणे : कुंटे चेस अकादमीच्या वतीने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या संलग्नतेने आयोजित चौथ्या मिलेनियम नॅशनल स्कूल व कुंटे चेस अकादमी विविध वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत गोरांक्ष खंडेलवाल, नैतिक माने, वेदांत काळे, शाश्वत गुप्ता यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वे रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत ९ वर्षाखालील गटात गोरांक्ष खंडेलवाल याने तनय माहेश्वरीचा पराभव करून ६ गुण व ३२.५ बुकोल्सकट सरासरीच्या जोरावर पहिला क्रमांक पटकावला. तर, रियांश पितळेने अनिश जवळकरचा पराभव करून ६ गुणांसह (३० बुकोल्स कट सरासरी) दुसरा क्रमांक पटकावला. विहान शहा याने अव्युक्त शर्माचा पराभव करून ६ गुणांसह (२८ बुकोल्स कट सरासरी) तिसरा क्रमांक पटकावला.
११ वर्षांखालील गटात दुसऱ्या पटावरील सामन्यात नैतिक माने याने रिजूल कुराडेवर विजय मिळवत ६ गुणांसह विजेतेपद पटकावले. तर, पहिल्या पटावर क्षितिज प्रसाद याने राघव पावडेला बरोबरीत रोखले व ६ गुणांसह (२८.५ बुकोल्स कट सरासरी) दुसरे स्थान मिळवले. हियान रेड्डीने विराट दोडकेला पराभुत करून ५.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
१३ वर्षांखालील गटात पहिल्या पटावर वेदांत काळे याने लाव्या अग्रवालचा पराभव करून ६.५ गुणांसह विजेतपदाचा मान पटकावला. याच गटात अमेय चौधरी व अविरत चौहान यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. १५ वर्षांखालील गटात शाश्वत गुप्ता याने शिवम पेठकरवर विजय मिळवत ६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. तर, याच गटात आरूष बुडजादे (५.५ गुण) याने दुसरे आणि परम जालन (५ गुण) याने तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय मास्टर अक्षय बोरगावकर, अमृत बोरगांवकर, मनीषा बोरगावकर, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, कुंटे चेस अकादमीच्या संचालिका मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर दीप्ती शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.