
टायब्रेकमध्ये हरिका द्रोणावल्लीला हरवले
नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिव्याने द्रोणावल्ली हरिका हिला टायब्रेकरमध्ये हरवले.
१९ वर्षीय दिव्या देशमुख हिने टायब्रेकरचा पहिला गेम पांढऱ्या सोंगट्यांसह जिंकला, तर दुसरा गेम काळ्या सोंगट्यांसह. दोघांमधील शास्त्रीय स्वरूपातील डाव बरोबरीत होता. दिव्या पहिल्यांदाच विश्वचषकात खेळत आहे. दिव्यापूर्वी ३७ वर्षीय कोनेरू हम्पी देखील उपांत्य फेरीत पोहोचली आहे. दिव्याचा सामना सेमीफायनलमध्ये चीनच्या टॅन झोंगीशी होईल आणि हम्पीचा सामना चीनच्या ली टिंग जीशी होईल.
टॉप तीनला कॅन्डिडेटचे तिकीट मिळेल
विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दोन भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हम्पी आणि दिव्या यांना कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याची उत्तम संधी आहे. टॉप तीन खेळाडूंना कॅंडिडेट स्पर्धेत प्रवेश मिळेल. कॅन्डिडेट स्पर्धेचा विजेता वर्ल्ड चॅम्पियनला आव्हान देतो. दुसऱ्या गेममध्ये हरिकाला पुनरागमन करण्याची संधी होती, पण ती सामना गमावली. हरिकाने दिव्याशी हस्तांदोलन करताच ती भावुक झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की ती उपांत्य फेरीत पोहोचली आहे.