< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); ठाणे मनपा क्षेत्रातील क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात  – Sport Splus

ठाणे मनपा क्षेत्रातील क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात 

  • By admin
  • July 24, 2025
  • 0
  • 206 Views
Spread the love

जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांचे मार्गदर्शन

ठाणे (सतीश पाटील) ः ठाणे मनपा क्षेत्रातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन तसेच मुंबई विभाग ऑनलाईन पोर्टल संदर्भातील अद्ययावत माहिती देण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांसाठी एक विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सदर प्रशिक्षणास ३५० क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

या प्रशिक्षणात सहभागी सर्व क्रीडा शिक्षकांना शालेय क्रीडा विभागाच्या नवीन धोरणांबाबत, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, स्पर्धा नियोजन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावर्षी होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा ठाणे महानगरपालिकेच्या मॅटवर आयोजित केल्या जाणार असल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले. या मॅटवर होणाऱ्या स्पर्धांचा विचार करता, शाळांतील खेळाडूंना मॅटवर सराव घेण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिल्या.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि मुंबई विभाग संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे यांचा सर्व शिक्षक व ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, क्रीडा अधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी, तसेच ठाणे मनपा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे व सचिव एकनाथ पवळे हेही उपस्थित होते आणि त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेचे गटशिक्षणाधिकारी पठाण यांची विशेष उपस्थिती होती.

प्रशिक्षकांना संबोधित करत असताना जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी क्रीडा समन्वयक शंकर बरकडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले, तसेच त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या क्रीडा सहाय्यक सीमा शिंदे यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ठाणे मनपा क्रीडा समन्वयक शंकर बरकडे यांनी प्रभावीपणे पार पाडले.

आभारप्रदर्शन करताना त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे व कार्यालयीन उपाधीक्षक प्राची डिंगणकर यांचे वेळोवेळी मिळणारे मोलाचे मार्गदर्शन सर्व क्रीडा शिक्षकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरते, आणि महानगरपालिकेतील सर्व क्रीडा स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *