
छत्रपती संभाजीनगर ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवगिरी महाविद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख चाँद यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रदीप चव्हाण व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर उपस्थित होते.
उद्घाटनपर शुभेच्छा संदेशांमध्ये शेख सलीम म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व पुढाकारातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि ही बाब सामाजिक भान जपणारी आहे. या शिबिरातील रक्त संकलनाचा अनेक रुग्णांना फायदा होणार आहे या माध्यमातून आपण अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. महाविद्यालय तरुण तरुणी यांनी रक्तदान ही चळवळ बनवली पाहिजे अशी भूमिका विशद केली.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी या रक्तदान शिबिरास आणि रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. सदरील रक्तदान शिबीर हे महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ७१ विदयार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी रक्तदान केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, प्रा सुरेश लिपाने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी, क्रीडा संचालक अधिकारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.