
जलतरण साक्षरतेविषयी जनजागृती
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक बुडणे प्रतिबंधक दिनानिमित्त अंबेलोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे संयोजक राजेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना पाण्यात बुडण्याची कारणे सांगत जलतरण साक्षरता किती महत्त्वाची आहे हे सांगितले.
२५ जुलै हा दिवस जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पाण्यात बुडण्याची कारणे आणि सुरक्षित राहण्याची शपथ घेतली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत सर्वेक्षणानुसार जगभरात दररोज किमान ६५० लोक पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडतात. जगात होणाऱ्या दहा प्रमुख अपघातांपैकी बुडून होणाऱ्या अपघाताचा तिसरा नंबर लागतो. पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८० टक्के प्रमाण हे शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणांचे आहे आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे. हे लक्षात घेऊन युनायटेड नेशनने २५ जुलै हा दिवस जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन म्हणून घोषित केला.
या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन व जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळ व ग्राम पंचायत अंबेलोहळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेतील विद्यार्थी,
शिक्षक वृंद व इतर सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहात जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस साजरा केला.
जलस्त्रोतांविषयी म्हणजे आड, विहीर, बारव, नदी-नाले-ओढे, डबके, डोह, बंधारा, खदाण, चारी पाट, कालवा, सरोवर, तलाव, शेततळे, समुद्र, खाडी, धबधबा आदी नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांविषयी सखोल मार्गदर्शन जागतिक जलतरण साक्षरतेचे संकल्पक राजेश भोसले व राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे संघटक गोपालकृष्ण नवले यांनी केले.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक आर आर दुम्मलवार यांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला एम के पाटील, प्रशांत हिवर्डे, जे जी पाटील, प्रकाश नागरे, मनीषा कुलकर्णी, दुर्गा चव्हाण, मनीषा भंडारे, आशा कर्डिले, आक्काबाई मुडशी, प्रियंका वरणकर, मनोज अमृतकर, शरद जाधव, अमित कुलकर्णी, विठ्ठल भडके, संदीप मुंडलिक, जयश्री पवार आदी उपस्थित होते.
बुडण्याची कारणे
- पोहता येत नाही तरी पोहण्याचा मोह
- जलस्त्रोतांची माहिती नसणे
- पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे
- मित्रांचा आग्रह
- क्षमते पेक्षा जास्त पोहणे
- इतरांना दाखवण्यासाठी पोहणे
- पोहण्या विषयी अर्धवट ज्ञान.
- पाय घसरून पाण्यात पडणे
- अचानक तोल जाणे
- वाहत्या पाण्यात पोहणे
- गाळात व माशांच्या जाळ्यात अडकणे
- प्रशिक्षण न घेता इतरांना वाचविण्याचा प्रयत्न करणे