
ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर सहा विकेटने विजय
सेंट किट्स ः वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेंट किट्स येथे तिसरा टी २० सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज टिम डेव्हिडने इतिहास रचला. डेव्हिडने अवघ्या ३७ चेंडूत १०२ धावा फटकावताना १७ चौकार व सहा षटकार ठोकले.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाची शानदार कामगिरी सुरूच आहे. यजमान वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत धुमाकूळ घालल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता टी २० मालिकेत आपली ताकद दाखवत आहे. पहिले दोन टी २० सामने जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ सेंट किट्स येथे तिसरा टी २० सामना खेळण्यासाठी आला होता आणि या सामन्यात टिम डेव्हिडने फलंदाजीने धुमाकूळ घातला होता. टिम डेव्हिडने ज्वलंत शैलीत फलंदाजी करून विक्रमांची रेलचेल केली. डेव्हिडने प्रथम १६ चेंडूत अर्धशतक ठोकून मार्कस स्टोइनिस आणि ट्रॅव्हिस हेड यांचे विक्रम मोडले.
टिम डेव्हिडने बॅटने कहर केला
डेव्हिड ऑस्ट्रेलियाकडून टी २० सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम मार्कस स्टोइनिस आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या नावावर होता. दोघांनीही १७-१७ चेंडूत ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद टी २० सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतरही, टिम डेव्हिड याने स्फोटक फलंदाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. परिणामी डेव्हिडने फक्त ३७ चेंडूत शतक पूर्ण केले.
डेव्हिडने त्याच्या टी २० कारकिर्दीतील पहिले शतक ११ षटकार आणि फक्त ६ चौकारांच्या मदतीने ठोकले. अशाप्रकारे, तो ऑस्ट्रेलियाकडून टी-२० मध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज बनला. इतकेच नाही तर, टिम डेव्हिड आता पूर्ण सदस्य राष्ट्रांच्या यादीत संयुक्तपणे तिसरा सर्वात जलद टी-२० मध्ये शतक करणारा फलंदाज आहे. त्याने भारताच्या अभिषेक शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टिम डेव्हिडचे हे शतक कोणत्याही कसोटी खेळणाऱया देशाविरुद्ध तिसरे सर्वात जलद शतक आहे.
ऑस्ट्रेलियाने टी २० मालिका जिंकली
टिम डेव्हिडच्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. अशाप्रकारे, पाहुण्या संघाने ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत ३-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने २१५ धावांचे मोठे लक्ष्य केवळ १६.१ षटकात पूर्ण केले. टिम डेव्हिडने १०२ धावा केल्या आणि नाबाद राहिला तर मिशेल ओवेनने १६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३६ धावांची नाबाद खेळी केली. टिम आणि ओवेनमध्ये चौथ्या विकेटसाठी १२८ धावांची शानदार भागीदारी झाली. २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एकेकाळी ३ बाद ६१ धावांवर होती, त्यानंतर टिम डेव्हिड आला आणि त्याने एक सनसनाटी खेळी केली आणि आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
सर्वात जलद टी-२० मध्ये शतक करणारा फलंदाज (पूर्ण सदस्य राष्ट्र)
डेव्हिड मिलर – ३५
रोहित शर्मा – ३५
अभिषेक शर्मा – ३७
टिम डेव्हिड – ३७
जॉन्सन चार्ल्स – ३९