अनिश सोनटक्के, अनन्या चांदे, नील मुळ्ये, पार्थ मगर यांना अग्रमानांकन
पुणे :सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांनी आयोजित केलेल्या रियाना बुटा चषक दुसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस रविवारी प्रारंभ होत असून या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत. पुरुष गटात अनिश सोनटक्के तर महिला गटात अनन्या चांदे यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुण्याचा खेळाडू नील मुळ्ये याला १९ वर्षाखालील मुलांच्या गटासाठी अव्वल मानांकन मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेली ही स्पर्धा कुपवाड येथील सूरज फाउंडेशन, नवकृष्णा व्हॅली बॅडमिंटन सभागृहात होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील श्वेता पार्टे नायक, श्रुती अमृते, मनुश्री पाटील, रुचिता दारवटकर, पलक झंवर, ईशान खांडेकर, कौस्तुभ गिरगावकर, दीपित पाटील, शौनक शिंदे, नील मुळ्ये या नामवंत खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. पुण्याचा खेळाडू शौनक याने खार जिमखाना आयोजित राज्यस्तरीय रोख पारितोषिकाच्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते.
परभणीची खेळाडू आद्या बाहेती हिला अकरा व पंधरा वर्षांखालील मुली या दोन्ही गटात अग्रमानांकन देण्यात आले आहे. तिने खार जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या रोख पारितोषिकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
या स्पर्धेसाठी भव्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा पुरुष व महिला, ११,१३,१५,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली या गटात होणार आहे.पुण्याचे आंतरराष्ट्रीय पंच मधुकर लोणारे यांची या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी गटवार मानांकने (अनुक्रमे मुले व मुली)
११ वर्षाखालील : अधिराज चौहान व आद्या बाहेती. १३ वर्षांखालील : अयान आठर व केशिका पूरकर. १५ वर्षाखालील : परम भिवंडीकर व आद्या बाहेती. १७ वर्षांखालील : पार्थ मगर व वैष्णवी जयस्वाल. १९ वर्षांखालील : नील मुळ्ये व हार्दि पटेल.पुरुष गट : अनिश सोनटक्के. महिला गट :अनन्या चांदे .