
उत्कर्ष शिलवंतला सुवर्ण आणि ३ कांस्य पदकांची कमाई
ठाणे : सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. रुषिकेश जोगळेकर आणि आवेज शेख या दोघांनी मिळून एकूण तीन कांस्य पदकांची कमाई करत ठाणे शहराचे नाव उंचावले. तर उत्कर्ष शिलवंत हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
विशेष म्हणजे, रुषिकेश आणि आवेज या दोघांनी केवळ बॅडमिंटनमध्ये उज्वल भविष्य घडवण्यासाठी आपले मूळ जिल्हे सोडून ठाण्यात स्थलांतर केले आहे. उत्कृष्ट प्रशिक्षण, काटेकोर सराव आणि राष्ट्रीय दर्जाचे कोचिंग मिळवण्यासाठी त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रंगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये राबविण्यात येणाऱ्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेची निवड केली आणि अल्पावधीतच आपल्या खेळात लक्षणीय प्रगती साधली आहे.
रुषिकेश जोगळेकरने पुरुष एकेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत पहिल्या फेऱ्यांमध्ये समर्थ कोकिळ (१५-१०, १५-५) आणि जिशान नदाफ (१५-२, १५-१) यांना सरळ सेट्समध्ये पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्याचा सामना उत्कर्ष शिलवंत या गुणी खेळाडूसोबत झाला. उत्कर्षने २१-१३, २१-१४ अशा फरकाने विजय मिळवला. विशेष म्हणजे उत्कर्ष शिलवंत हाही ठाणे बॅडमिंटन अकादमीचा माजी खेळाडू असून, त्याचं घडणं देखील याच प्रशिक्षण योजनेतून झालं आहे.
रुषिकेशने विवेक सामलेत्तीसह पुरुष दुहेरी गटातसुद्धा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, जिथे त्यांना राहुल तिवारी आणि आनंद मुसळे यांच्या जोडीने २१-१७, २१-१८ अशा फरकाने हरवलं. आवेज शेखने अंडर १९ मुलांच्या एकेरी गटात सार्थक साळुंके (१५-७, १५-५) आणि श्रवण बजाज (१५-१०, १५-११) यांना हरवत उपांत्य फेरी गाठली. तिथे त्याला सार्थक कुलकर्णीकडून १६-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.
या दोघांची मेहनत, जिद्द आणि खेळातील निष्ठा खरंच प्रेरणादायी आहे. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत दोघांचं कौतुक केलं आणि म्हणाले, ’ही सुरुवात आहे. हे खेळाडू राष्ट्रीय पातळीवरही लवकरच ठसा उमटवतील, यात शंका नाही.’