
छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांसाठी टी ५५ रणगाड्याचे अनावरण; कारगिल स्मृती उद्यानाचे काम वेगाने सुरू
छत्रपती संभाजीनगर : सरकार विकास प्रकल्पाबद्दल सकारात्मक आहे. कारगिल युद्धाच्या थीमवर आधारित बागेचे काम पूर्ण वेगाने सुरू आहे आणि ऑपरेशन सिंदूर संकल्पनेवर आधारित आणखी एक उद्यान छत्रपती संभाजीनगर शहरात उभारले जाईल, असे इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे यांनी कारगिल विजय दिंनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी सांगितले.
मंत्री अतुल सावे हे कारगिल स्मृतिवन समितीच्या वतीने गारखेड्याच्या कारगिल स्मृती उद्यानात माजी नगरसेवक पंकज भारसाखाळे यांच्या पुढाकाराने कारगिल युद्धवीरांना मानवंदना अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीच्या ‘वीरांचा शौर्यगौरव’ या कार्यक्रमात बोलत होते.

प्रारंभी शहीद स्थंभाला मानवंदना अर्पण करण्यात आली आणि नंतर भारतीय सैन्याने दिलेल्या टी ५५ रणगाड्याचे लोकार्पण मंत्री अतुल सावे यांनी केले. शनिवारी (२६ जुलै) सकाळी झालेल्या या सोहळ्यासाठी सुमारे १२ शाळांमधील २४०० विद्यार्थी, शिक्षक, माजी सैनिक, वीर माता, वीरपत्नी तथा शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल युद्धाच्या संकल्पनेवर आधारित हे महाराष्ट्रातील पहिलेच उद्यान आहे. येथे थिएटर उभारले जाणार आहे जे कारगिल युद्धावर आधारित चित्रपट पाहण्यास सोयीचे ठरेल. कारगिल युद्धात सहभागी झालेल्या मराठवाड्यातील सैनिकांच्या शौर्याचे दर्शन घडवणारी गॅलरीही येथे पूर्णत्वाकडे जात आहे, अशी माहिती ही समितीच्या वतीने यावेळी देण्यात आली.

जखमी झालेल्या सैनिकांचा सन्मान
कारगिल स्मृती वन समितीने विविध युद्ध प्रसंगादरम्यान कायमचे अपंगत्व आलेल्या सैनिकांचा यावेळी सन्मान केला. यात सैनिक सुभाष जाधव, दत्तात्रय जाधव, रामदास बनसोड, भाऊसाहेब शिंदे आणि रमेश साळवे यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय माजी सैनिक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, विंग कमांडर टी.आर. जाधव, कर्नल काटकर, कर्नल सोनवणे आणि कमांडर अनिल सावे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कारगिल स्मृती वन समितीने मंत्री अतुल सावे यांचा विशेष सत्कार यानिमित्ताने केला.

लवकरच ऑपरेशन सिंदूरवर उद्यान – सावे
कारगिल विजय दिनाच्या समारंभात बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, ‘सरकार कारगिल स्मृती वनसारख्या प्रकल्पांसाठी सकारात्मक आहे म्हणून या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आता आमच्याकडे येथे एक रणगाडा आहे. आम्ही लोकांसाठी एक विमान देखील मिळवू आणि या वर्षाच्या अखेरीस ते येथे बसवू देखील. या बागेत मराठवाड्यातील कारगिल योद्ध्यांच्या कथा सांगितल्या जातील. येथे एक थिएटर देखील उभारले जाईल ज्यामध्ये १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धाशी संबंधित चित्रपट दाखवले जातील. शहरात येणाऱ्या पर्यटकांना येथे दाखवण्यासाठी खूप काही आहे. हे उद्यान देश आणि परदेशातील पर्यटकांना देखील आकर्षित करेल. त्याचप्रमाणे, शहरात ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर आधारित एक उद्यान देखील तयार केले जाईल. महानगरपालिकेने त्यासाठी जमीन द्यावी आणि आम्ही राज्य सरकारकडे निधी मागू’.
डंपिंग ग्राउंडचे उद्यानात रूपांतर केल्याचा अभिमान आहे – आयुक्त श्रीकांत
महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले, ‘आम्ही एका डंपिंग ग्राउंडचे बागेत रूपांतर केले आहे आणि आम्हाला या प्रकल्पाचा अभिमान वाटतो. आम्ही पुणे आणि नागपूरच्या वेगाने शहराचा विकास करणार आहोत. ऑपरेशन सिंदूरवर आधारित एक उद्यान उभारले पाहिजे आणि महानगरपालिका त्याला सर्वतोपरी मदत करेल’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच उद्यान : मेजर फिरासत
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत म्हणाल्या की, ‘कारगिल युद्धाच्या ऑपरेशन विजय थीमवर आधारित ही पहिली बाग आहे जी सुरू आहे. काम पूर्ण वेगाने सुरू आहे आणि आम्ही नजीकच्या काळात हे उद्यान पूर्ण करू. हे उद्यान कारगिल युद्धात या भागातील सैनिकांचे योगदान समोर आणणारे ठरणार आहे’.
उद्यान आपल्या सैनिकांच्या शौर्याचे वर्णन करेल – पंकज भारसाखळे
कारगिल स्मृतीवन समितीचे प्रमुख पंकज भारसाखळे म्हणाल्या की, ‘स्मारक आता आकार घेत आहे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना भूतकाळातील आपल्या सैनिकांचे योगदान आणि बलिदान समजण्यास नक्कीच मदत होईल’.
प्रमोद सरकटे आणि स्वराज सरकटे यांनी येथे देशभक्तीपर गीतांची मालिका सादर केली. अमृत बिर्हाडे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाचे आयोजक व कारगिल स्मृतिवन समितीचे प्रमुख माजी नगरसेवक पंकज भारसाखळे, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, निवृत्त एसीपी पंडित केंद्रे, प्रा गोविंद केंद्रे, जगदीश चव्हाण, अर्जुन गवारे, सुदाम साळुंके, गजानन पिंपळे, जसवंत सिंग हे उद्यान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.