
मुंबई ः बलबीर सिंग जुनेजा इनडोअर स्टेडियम, रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरचा खेळाडू विन्स पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत -७४ किलो वजनी गटातील लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.
या स्पर्धेत विन्स पाटीलने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि तांत्रिक खेळाचे दर्शन घडवत चढत्या फेऱ्यांमध्ये मोठ्या आत्मविश्वासाने विजय मिळवले. पहिल्या फेरीत तामिळनाडूच्या खेळाडूवर मात, दुसऱ्या फेरीत गुजरातचा पराभव,
तिसऱ्या फेरीत जम्मू-काश्मीरवर वर्चस्व आणि अंतिम फेरीत पुन्हा तामिळनाडूच्या आर युवन शंकर याचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.
विन्सच्या या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाची शान वाढली. या यशामागे मुंबई जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष उमेश मुरकर यांचे नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व रेफरी विघ्नेश मुरकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन मोलाचे ठरले. स्पर्धेत रोशन शेट्टी यानेही सहभाग घेतला व मुंबईचा ठसा उमटवला. वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष अगरवाल व वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी विन्स पाटीलच्या सुवर्ण यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विन्स पाटीलचे हे यश केवळ वैयक्तिक नव्हे, तर मुंबई शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे. अशा युवा खेळाडूंना योग्य दिशा, व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचे नेतृत्व नक्कीच करू शकतील.