
शुभमन गिलचे विक्रमी शतक, मालिकेत चार शतके ठोकणारा पहिला कर्णधार
मँचेस्टर : कर्णधार शुभमन गिल (१०३), रवींद्र जडेजा (नाबाद १०७), वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १०१) आणि केएल राहुल (९०) यांच्या अविस्मणीय फलंदाजीमुळे भारतीय संघाने चौथा कसोटी सामना अनिर्णित ठेवला. भारतीय फलंदाजांनी तीन शतके ठोकत इंग्लंड संघाचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. तब्बल १४३ षटके चिवट फलंदाजी करुन भारतीय संघाने चार बाद ४२५ धावा फटकावत मँचेस्टर मोहीम फत्ते केली. सध्या इंग्लंड २-१ने मालिकेत आघाडीवर आहे. पाच विकेट आणि शतक ठोकणारा बेन स्टोक्स हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

इंग्लंड संघाने पहिल्या डावात ६६९ असा धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय संघासमोर डावाचा पराभव टाळण्याचे आव्हान उभे होते. त्यात यशस्वी जैस्वाल (०) आणि साई सुदर्शन (०) हे धावांचे खाते उघडण्यापूर्वी तंबूत परतले. दोन बाद ०० अशा स्थितीत केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी करत सामन्यात सन्मानजनक स्थिती आणली. केएल राहुलचे शतक अवघ्या १० धावांची हुकले. बेन स्टोक्सने राहुलला ९० धावांवर पायचीत बाद केले.

शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ३४ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल याने या मालिकेत चौथे शतक ठोकून एक नवा इतिहास लिहिला आहे. एका मालिकेत चार शतके साजरे करणारा गिल हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. गिल याने २३८ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांसह १०३ धावा काढल्या. जोफ्रा आर्चरने त्याची विकेट घेतली.
चार बाद २२२ या धावसंख्येवर रवींद्र जडेजा मैदानात उतरला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद २०३ धावांची भागीदारी करुन इंग्लंडचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. सुंदर याने पहिले कसोटी शतक साजरे केले. सुंदर याने २०६ चेंडूंचा सामना करत नाबाद १०१ धावा फटकावल्या. त्याने ९ चौकार व १ षटकार मारला. जडेजाने पाचवे शतक साजरे केले. जडेजाने १८५ चेंडूंचा सामना केला आणि १३ चौकार व १ षटकार मारला. जडेजा १०७ धावांवर नाबाद राहिला. जडेजा आणि सुंदर हे शतका जवळ असताना स्टोक्स याने सामना अनिर्णित ठेवण्याचे सांगितले. परंतु, स्टोक्सची ऑफर या जोडीने धुडकावली आणि दोघांनी शतके साजरे करत इंग्लंडची चांगली दमछाक केली. जडेजाने इंग्लंडविरुद्ध एक हजार कसोटी धावा काढल्या आहेत.