
वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धा
सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित व आयटीफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ एमटी ४०० वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ३० वर्षांवरील महिला गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित वैभवी त्रिवेदी हिने सोलापूरच्या पूजा सालगुडेचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
एमएसएलटीए टेनिस सेंटर आणि इलीसीएम क्लब जामश्री कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर पेठ, सोलापूर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत ४० वर्षांवरील महिला गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित सिद्धी खजुरियाने गुरवीर कौर तूरचा ६-१, ६-० असा तर, बिगर मानांकित पारुल गुजराती हिने दुसऱ्या मानांकित प्रणिता पेडणेकर हिचा ६-३, ४-६, १०-६ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

५० वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात कुमुद्दीन खानने तिसऱ्या मानांकित आशिष पंतचा ६-४, ३-६, ११-९ असा कडवा प्रतिकार केला. अव्वल मानांकित पुण्याच्या सुनील लुल्ला याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत शंकर सुब्रमण्यमचा ६-२, ६-० असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. ६० वर्षांवरील पुरुष गटात दुसऱ्या फेरीत बिगर मानांकित लक्पा शेरपा याने चौथ्या मानांकित शरद टाकचा ४-६, ७-६ (५), १०-७ असा तर, अनिल कुमारने सातव्या मानांकित अरुण अग्रवालचा ६-०, ६-२ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. सोलापूरच्या राजीव देसाईने आठव्या मानांकित शिरीष नांदुर्डीकरवर ६-२, ६-४ असा सनसनाटी विजय मिळवला.
४५ वर्षांवरील मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत सोलापूरच्या संध्याराणी बंडगर व राजीव देसाई या जोडीने बेंगळूरच्या स्मिता रवींद्र व निलेश रुंगठा या जोडीचा अडीच तास चाललेल्या अटीतटीच्या व रोमहर्षक सामन्यात ५-७, ६-२, १६-१४ असा सुपर टायब्रेक मधे पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.