
आता तरी अकरावी प्रवेश करा, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी
छत्रपती संभाजीनगर : सध्या सुरू असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विलंबामुळे व आतापर्यंत केवळ ५० टक्केच जागा भरल्या गेल्या आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना प्रचंड आर्थिक नुकसान झाला असून वेळेचा अपव्यय झालेला आहे.
दहावीचे निकाल लागून अडीच महिने झाले तरी प्रवेश प्रक्रिया संपलेली नाही व अजून एक महिना संपण्याची शक्यता दिसत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले हे आहे व ते अधिक होऊ नये म्हणून किमान येणाऱ्या चौथ्या फेरीत कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेशाचे अधिकार द्यावेत याकरिता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक संघटनेने आज उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
येणाऱ्या काळात कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित तुकड्या टिकविणे, शिक्षकांची पद वाचविणे व इतर संभाव्य धोके टाळण्यासाठी किमान यापुढील प्रवेश प्रक्रियेचे अधिकार स्थानिक प्राचार्य अथवा मुख्याध्यापक यांना देऊन मागणीप्रमाणे प्रवेश देण्याचे अधिकार शासनाने द्यावेत व झालेल्या प्रवेश ऑनलाईन पद्धतीने शासनात कळविण्याची सुविधा देण्यात यावी यास्तव राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे सर्व राज्यात मंगळवारी निवेदन देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक संचालक रवींद्र वाणी यांनी तर शिक्षणाधिकारी कार्यालयात उपशिक्षणाधिकारी सिताराम पवार यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा रवींद्र पाटील, संस्थाचालक संघटनेचे वाल्मीक सुरासे, जुकटा जिल्हा कार्याध्यक्ष प्रा चंपालाल कहाटे, विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रदीप पाटील, सरस्वती भुवन महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय गायकवाड, प्रा बाळासाहेब पवळ, डॉ शिवानंद भानुसे, प्रा राकेश खैरनार, प्रा प्रदीप मोहटे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.