
धोनी, तेंडुलकर, कोहली, रोहित समवेत खेळणार फुटबॉल सामना
नवी दिल्ली ः फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी लवकरच भारतात येत आहे. भारतात येताना अर्जेंटिनाचा हा खेळाडू पायात फुटबॉलऐवजी हातात क्रिकेट बॅट घेऊन दिसणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, लिओनेल मेस्सी आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संघात क्रिकेट सामना खेळला जाईल. भारताचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील या ऐतिहासिक सामन्याचा भाग असणार आहेत.
लिओनेल मेस्सी या हिवाळ्यात भारतात येत आहे. मेस्सी १३ ते १५ डिसेंबर दरम्यान भारतात असेल. या दरम्यान, १४ डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी आणि एमएस धोनीच्या संघात सेव्हन-ए-साईड सामना खेळला जाऊ शकतो, जो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची अपेक्षा आहे. धोनी व्यतिरिक्त, सचिन, विराट आणि रोहित देखील या सामन्यात एकत्र खेळताना दिसू शकतात. मेस्सी भारत दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राव्यतिरिक्त दिल्ली आणि कोलकाता येथे जाऊ शकतो. मेस्सीचा हा दौरा प्रमोशनल टूर असू शकतो.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) मधील एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ‘लिओनेल मेस्सी १४ डिसेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर असेल. तो भारतीय संघाच्या माजी आणि सध्याच्या खेळाडूंसोबत येथे क्रिकेट सामना देखील खेळू शकतो. सर्व गोष्टी निश्चित झाल्यानंतर या सामन्याच्या आयोजनाची संपूर्ण माहिती देता येईल’.
मेस्सी यापूर्वीही भारतात आला आहे
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुसऱ्यांदा भारतात येत आहे. हा खेळाडू २०११ मध्ये पहिल्यांदाच भारतात आला होता. त्यावेळी मेस्सीने कोलकात्यातील साल्ट लेक फुटबॉल स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्ध सामना खेळला होता. आता यावेळी मेस्सी त्याच्या भारत दौऱ्यावर दिग्गज खेळाडूंसोबत क्रिकेट सामना खेळू शकतो.