
प्रद्युम्न मुळे, शर्वरी देशमुख, आदित्य खंडारेला विजेतेपद
बुलढाणा ः व्हीआरचेस अकॅडमी व तोमई इंग्लिश स्कूल, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन तोमई इंग्लिश स्कूल बुलढाणा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे १५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये माईंड चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. माईंड चेस अकॅडमीतर्फे १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये खुल्या गटात सुमित चिंचोले याने ८ पैकी ७ राऊंड जिंकून चौथा क्रमांक आणि रोख ८०० रुपयांचे पारितोषिक संपादन केले. याच गटात ईशांत घट्टे याने ६ पॉईंट जिंकून पाचवा क्रमांक मिळवत रोख ६०० रुपयांचे पारितोषिक मिळवले.
१३ वर्षांखालील गटात प्रद्युम्न मुळे याने ८ पैकी ६ पॉईंट जिंकून विजेतेपद पटकावले. त्याने १ हजार रुपये व ट्रॉफी पटकावली. तर अथर्व केळकर याने ८ पैकी ६ पॉईंट जिंकून उपविजेतेपद मिळवले. त्याने रोख ५०० रुपये व ट्रॉफी मिळवली. आरुष मोरे याने ५.५ गुण जिंकून चौथा क्रमांक व ट्रॉफी मिळवली. समर्थ नागरे याने ५ पॉईंट मिळवून आठवा क्रमांक व मेडल मिळवले.
याच १३ वर्षांआतील गटात मुलींमधून प्रथम क्रमांक शर्वरी देशमुख हिने ८ पैकी ६ पॉईंट जिंकून मिळवला. तिने रोख एक हजार रुपये व ट्रॉफी मिळवली व सुविरा सिरसाठ हिने चौथा क्रमांक व ट्रॉफी मिळवली. १७ वर्षांखालील गटात आदित्य खंडारे याने ८ पैकी ६ पॉईंट जिंकून प्रथम क्रमांक पटकावले. आदित्य याने एक हजार रुपये व ट्रॉफी पटकावली. याच गटात मुलींमधून मृगजा निंबाळकर हिने ४ पॉईंट जिंकून सहावा क्रमांक व मेडल जिंकले.
९ वर्षांखालील गटात शाश्वत देशमुख याने ८ पैकी ६ पॉईंट मिळवत सहावा क्रमांक व मेडल मिळवले तर याच गटात श्रीष इंगोले याने ४ पॉईंट जिंकून दहावा क्रमांक व मेडल मिळवले. मुलीमधून याच गटात अनघा केळकर हिने सहावा क्रमांक व मेडल जिंकले. श्रेय माईंड चेस अकॅडमी बुलढाणाचे संचालक तथा अध्यक्ष, राष्ट्रीय बुद्धिबळ पंच, स्कूल ईन्स्ट्रक्टर अमोल इंगळे यांचे या विजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.